जिल्हा नियोजनकडून सदस्यांनाच माहिती देण्यात टाळाटाळ

सदस्य नवले : दालनात बैठा सत्याग्रह करणार
जिल्हा नियोजन समिती
जिल्हा नियोजन समिती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असलेले शरद नवले यांनाच जिल्हा नियोजन अधिकार्‍यांकडून जिल्हा वार्षिक योजनेतील प्राप्त, खर्चीत व अखर्चित निधीची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. नवले यांनी जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे यांना वेळोवेळी लेखी पत्र देऊनही त्यांना कुठलीच माहिती मिळालेली नाही. आठ दिवसांत त्वरीत लेखी माहिती न दिल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या दालनात बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा नवले यांनी दिला आहे.

सदस्य नवले यांनी 17 मे, 2022 रोजी जिल्हा नियोजन अधिकारी भदाणे यांना पत्र दिले होते. त्यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2019-2020 ते 2021- 2022 मधील काम निहाय किती निधी प्राप्त झाला, योजना निहाय खर्च झाला व अखर्चित राहिला याबाबत सविस्तर माहिती मागितली होती. यामध्ये नाविन्यपूर्ण योजना, अपारंपरिक सौर योजना, वन संरक्षण, आमदार, खासदार संगणक खरेदी तसेच डिजिटल सॉप्टवेअर कोणत्या पुरवठा दराने केला, बंधारे, प्रत्येक वर्षाचा खर्चाचा सविस्तर अहवाल मागितला होता.

जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकडून नवले यांना माहिती न मिळाल्याने नवले यांनी 27 जून, 2022 रोजी पुन्हा पत्र देऊन माहितीची मागणी केली होती. वेळोवेळी लेखी पत्र व प्रत्यक्ष भेटून देखील माहिती न मिळाल्याने 25 जुलै रोजी नवले यांनी आणखी एक पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, माहिती देण्यास दोन महिन्यांपासून जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे. आठ दिवसांत त्वरीत लेखी माहिती मिळावी, माहिती न मिळाल्यास मी आपल्या दालनात कुठलीही पूर्वसूचना न देता बैठा सत्याग्रह करणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन अधिकारी म्हणून आपली राहील, असे पत्रात नमूद केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com