अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मंजुरीनंतर गेली वर्षभर रखडलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्यांचा विषय अखेर मार्गी लागला आहे.

मागील आठवड्यात या विषयावर अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर प्रशासनाने अखेर जिल्ह्यात नव्याने 316 तर जुन्या 309 शाळा खोल्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यात नवी खोल्यांसाठी 28 तर दुरूस्तीसाठी 3 कोटी अशा 31 कोटींच्या निधीचा समावेश आहे. यात सर्वाधिक शाळाखोल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या तालुक्यातील आहेत.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजार शाळा आहेत. मात्र त्यातील अनेक शाळा खोल्यांची पडझड झाली आहे. निंबोडी येथील दुर्घटनेनंतर शाळा खोल्या दुरुस्ती तसेच नवीन खोल्या बांधकामाचा विषय ऐरणीवर आला. त्यानुसार मोडकळीस आलेल्या शाळा खोल्यांचे निर्लेखन करण्यात आले. जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा नियोजनमधून त्यासाठी निधी मागितला. पालकमंत्र्यांनी त्याला मंजुरी देत तब्बल 28 कोटींचा निधी मंजूर केला.

जिल्ह्यात सध्या 930 शाळा खोल्यांची गरज असून त्यापैकी 316 शाळांना चालू आर्थिक वर्षात प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 28 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय 309 शाळा खोल्यांची दुरुस्तीही विचारात घेतली असून त्या दुरुस्तीलाही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यासाठी वेगळी तीन कोटीची तरतूद आहे. 31 मार्च 2022 पर्यंत या खोल्यासाठी मंजूर निधी खर्च करायचा आहे.

त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले असून येत्या काही दिवसात कामांना सुरुवात होणार आहे. दुसरीकडे शिर्डीच्या साईसंस्थाने शाळा खोल्यांसाठी निधी मंजूर केलेला आहे. मात्र, अद्याप न मिळाल्याने याबाबत जिल्हा परिषदेकडून कोणतीच माहिती मिळाली नाही. विशेष शिर्डी संस्थांच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शाळा खोल्या बांधून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

नवीन आणि कंसात दुरुस्ती शाळा खोल्या

अकोले 21 (5), संगमनेर 32 (35), कोपरगाव 22. (52), राहाता 13 (27), राहुरी 14 (9), श्रीरामपूर 9 (13), नेवासा 30 (38), शेवगाव 48 (13), पाथर्डी 15 (8), जामखेड 6 (15), कर्जत 17 (11), श्रीगोंदा 17 (7), पारनेर. 25 (31) आणि नगर 47 (35) असे एकूण 316 नवीन आाणि दुरूस्ती 309 या कामांना मंजूरी देण्यात आली आहे.