
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सन 2023-24 साठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारणसाठी) 548 कोटी 26 लाख, आदिवासी उपाययोजनांसाठी 47 कोटी 52 लाख आणि अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी 144 कोटी एकूण 639 कोटी 78 च्या निधीला मंजूरी देण्यात आल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी पालकमंत्री विखे बोलत होते. ते म्हणाले, 2023-24 साठी जिल्हा वार्षिक योजनेतून प्राथमिक आरोग्य केंद्र-उपकेंद्र बळकटीकरण, प्राथमिक शाळा बांधकाम, दुरूस्ती, ग्रामीण व अन्य जिल्हा रस्ते विकास, ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान, अंगणवाड्या बांधकाम, शून्य ते शंभर हेक्टरपर्यंतच्या कोल्हापूर बंधारे योजना, महाराष्ट्र नगरोत्थान महा अभियान, नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा आदी योजनांसाठी वाढीव अनुदानाची मागणी करण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित राज्यस्तर बैठकीत स्वतंत्रपणे सादरीकरण करून जिल्ह्याच्या विकासासाठी जास्ती जास्त निधीची मागणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, नियोजन समितीच्या 2022-23 च्या सर्वसाधारण, आदिवासी आणि अनुसूचित जाती उपाययोजनांचा आढावा कालच्या बैठकीत घेण्यात आला. यात जिल्ह्यासाठी 753 कोटी 52 कोटींचा निधी मंजूर असून आजअखेर 365 कोटी 53 लाखांचा निधी प्राप्त झालेला आहे. प्राप्त निधीपैकी 98 कोटी 48 लाखांचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे. राज्य शासनाने विहीत केलेल्या कार्यपध्दतीनूसार सर्वसाधारण योजनेतून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी उपलब्ध करून द्याच्या 64 कोटी 60 लाख आणि जनावरांच्या लम्पी प्रार्दुभाव उपाययोजनेसाठी तातडीने पुनर्विनियोजन तसेच 6.45 कोटी रुपयांचे संभाव्य बचतीचे प्राधान्याक्रमानूसार करावयाच्या पुनर्विनियोजनास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
पाच तिर्थस्थळांना क वर्ग दर्जा
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पाच तिर्थस्थाळांचे प्रस्ताव क वर्ग दर्जा देण्यासाठी नियोजन समितीकडे पाठवले होते. या पाचही देवस्थांना क वर्गाचा देण्यात आला आहे. यात श्री रामेश्वर देवस्थान वारी, कोपरगाव. श्री मयुरेश्वर पावन देवस्थान, नवीन चांदगाव, नेवासा. श्री विश्वेश्वर नाथबाबा ट्रस्ट, नेवासा बु., श्री भगवानबाबा देवस्थान, चिकणी संगमनेर, आणि श्री जागृत दुर्गामाता देवस्थान, शिराळ पाथर्डी यांचा समावेश असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.