अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात ‘वन नेशन, वन रेशन’ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. परराज्यातील कार्डधारकांना नॅशनल पोर्टेबिलिटीद्वारे धान्य देण्यात येणार आहे.

तशा सूचना रेशन धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील लोकांनाही आता गाव, तालुका, जिल्ह्यातील कोणत्याही रेशन धान्य दुकानातून आपले धान्य खरेदी करता येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.

परराज्यातील नागरिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राहत आहेत. त्यांचे रेशन कार्ड त्यांच्या राज्यात असले तरी त्यांना या योजनेद्वारे जिल्ह्यात धान्य उपलब्ध होणार आहे. तसेच जिल्ह्यातील लोक मोठ्याप्रमाणात आपले गाव सोडून इतर तालुका, जिल्ह्यात कामाला जात असतात. त्यांना त्याठिकाणी धान्य घेता येणार आहे.

मात्र, संबंधित नागरिकांचे कार्ड कोणते आहे? त्यानुसार किती धान्य देय आहे. तेवढेच धान्य संबंधितांना दिले जाणार आहे. स्थानिक रेशन कार्ड नसले तरी संबंधितांना नॅशनल पोर्टेबिलिटीद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने परराज्यासह इतर जिल्ह्यांतील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना धान्य मिळणार आहे. एकूण किती सदस्यांचा नामोल्लेख आहे, त्यापैकी किती सदस्य जिल्ह्यात राहतात? तेवढ्या सदस्यांचे धान्य बायोमेट्रिकद्वारे उपलब्ध होणार आहे. कार्डवर नावे असलेल्या उर्वरित सदस्यांना त्यांचे धान्य त्यांच्या राज्यात घेता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी होणार आहे.

गावातील धान्य दुकानदारांकडून रेशन कार्ड धारकांना वारंवार त्रास होतो. याविषयी पुरवठा विभागाकडे तक्रारी येत असतात. आता रेशन कार्ड धारक व्यक्ती आपले धान्य राज्यातील कोणात्याही दुकानातून खरेदी करू शकतो. सदरची योजना जिल्ह्यात जानेवारीपासून राबविण्यात येत आहे. आतापर्यंत शहरातील दोन परप्रांतीय लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी पुरवठा विभाग रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जनजागृती करणार आहे.

‘मेरा राशन’ अॅप

रेशन धान्य दुकानदारांनी लाभधारकांची माहिती ‘मेरा राशन’ या अॅपवर भरली आहे. हे अॅप सर्वसामान्यांना खुले असून त्याद्वारे आपल्या कोठ्यातील धान्याची माहिती आपल्याला आधार किंवा शिधापत्रिका क्रमांक टाकल्यानंतर अॅपवर पाहता येणार आहे. धान्य दुकानाविषयी काही तक्रारी असल्यास 14445 हा टोलफ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मार्च-एप्रिलमध्ये रेशनवर मका, ज्वारी

मार्च- एप्रिल महिन्यामध्ये जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, पाथर्डी, नगर, कर्जत, जामखेड व श्रीगोंदा या आठ तालुक्यात रेशनवर मका उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर नेवासा, शेवगाव तालुक्यात ज्वारी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंत्योदयधारकांना 18 किलो तर प्राधान्य धारकांना प्रतिलाभार्थी 2 किलो ज्वारी दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.