खबरदार.. कामाशिवाय बाहेर पडल्यास होणार कारवाई

नगर जिल्ह्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन सुरू
खबरदार.. कामाशिवाय बाहेर पडल्यास होणार कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात करोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. विविध शहरांत करोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय.

राज्यातील प्रत्येक शहरात करोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी नगर जिल्ह्यासह राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. याबाबतचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले आहेत.

अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. तसंच अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या लोकांना आपल्या कामावर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरू राहणार आहे.

‘ब्रेक द चेन’ची संपूर्ण नियमावली

काय सुरू राहणार

रूग्णालये, औषध दुकाने, वैद्यकीयसंबंधी सेवा, किराणा मालाचे दुकाने, भाजीपाला दुकाने, पशुवैद्यक सेवा, फळ विक्रते, दुग्धालये, बेकरी, अन्न पदार्थ विक्री दुकाने, शीतगृहे, रेल्वे, बस, टॅक्सी, अ‍ॅटो, सर्व प्रकारची मालवाहतूक, कृषी व कृषीविषयक सर्व पुरक सेवा, मान्यता प्राप्त माध्यमे, पेट्रोलपंप, कार्गो सेवा, वीज, गॅस पुरवठा सेवा, एटीएम, पोस्ट सेवा, अत्यावश्यक सेवेसाठी कच्चा माल, पॅकेजिंग मटेरियल युनिट, शासकीय, स्थानिक संस्थांची कार्यालये, सहकारी, सार्वजनिक आणि खाजगी बँका, विमा, मेडिक्लेम कंपनी, सर्व वकीलांचे कार्यालये. या सर्वांना नियम व अटींचे पालन करावे लागणार आहे. तसे न झाल्यास दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

हे बंद राहणार

धार्मिक स्थळेे, हॉटेल्स, बार, थिएटर्स, वॉटर पार्क, क्रिडा संकुले, अत्यावश्यक सेवा न पुरविणारे सर्व दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर, सलून, ब्युटी पार्लर, शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम.

सार्वजनिक वाहतुकीसाठी निर्बंध काय?

अटोरिक्षा = चालक अधिक 2 प्रवासी

टँक्सी (चारचाकी) = चालक अधिक पन्नास टक्के वाहन क्षमता

बस = पूर्ण प्रवासीक्षमता, उभे प्रवासी बंदी

सर्व प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना तोंडाला मास्क लावणे सक्तीचे आहे. मास्क नसल्यास पाचशे रुपये दंड केला जाईल. चारचाकी टँक्सीमधे एखाद्या प्रवाशाने मास्क न घातल्यास तो प्रवासी आणि चालकालाही पाचशे रुपये दंड केला जाईल. प्रत्येक खेपेनंतर वाहनं सॅनिटाईज करणे आवश्यक आहे.

सध्या बंद असलेल्या सर्व दुकानांना सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या सर्व कामगारांचे लशीकरण करून घ्यावे.

विवाहासाठी केवळ 25 जणांची उपस्थिती, अटीही..

नगर जिल्ह्यात करोनाचा हाहाकार सुरू असल्याने विवाह सोहळ्यासाठी काही अटींवर केवळ 25 जणांच्या उपस्थितीत पार पाडावा लागणार आहे. मंगलकार्यालयाशी संबंधित सर्व कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झालेले आवश्यक असेल. लस घेतली नसल्यास करोना चाचणी निगेटिव्ह असलेबाबतचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. तसे नसल्यास कसुरदारांकडून 1000 रूपये तर आस्थापनाकडून 10 हजार रूपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. धार्मिक स्थळाच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार्‍या विवाह समारंभानाही हे सर्व नियम व अटी लागू असतील. अंत्यविधीस जास्तीत जास्त 20 लोकांनाच उपस्थित राहता येईल.

नियम मोडल्यास कडक कारवाईचे आदेश

जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत. मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत, किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात अशा स्पष्ट सुचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच विवाह समारंभ हे करोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे लक्षात आले आहे, त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा व पोलीस प्रशासनाने वे असेही ते म्हणाले.

वर्तमानपत्र वितरण

वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके यांचे मुद्रण व वितरण करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. वर्तमानपत्रांची होम डिलेवरीही करता येणार आहे. यासाठी सर्वांनी तात्काळ लसीकरण करून घेणे आवश्यक असेल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com