जिल्ह्यातील पशुधनावर संसर्गजन्य विषाणूचा हल्ला

नेवासा तालुक्यातील गोधेगावात सात बाधित जनावरे आढळली, पथकाकडून पाहणी
जिल्ह्यातील पशुधनावर संसर्गजन्य विषाणूचा हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मराठवाड्यापाठोपाठ जिल्ह्यातील गाय, बैल, म्हैस, कालवड, वासरेे, गोर्‍हे यांच्यावर लंपी स्कीन डिसीज संसर्गजन्य विषाणूचा प्रादूर्भाव झाला आहे.

नेवासा तालुक्यातील गोधेगाव याठिकाणी या विषाणूने ग्रस्त सात जनावरे आढळली असून जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती सुनील गडाख यांनी तातडीने त्याठिकाणी पशुसंवर्धन विभगाच्या डॉक्टरांची चमू पाठवून उपचार सुरू केले आहेत.

तसेच या विषाणूचा जिल्ह्यात फैलाव होऊ नये, यासाठी लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यात दीड महिन्यांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात लंपी स्कीन डिसिज या संसर्गजन्य विषाणूचा जनावर प्रादूर्भाव झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर या विषाणूचा मराठवाड्यातील बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात फैलाव पहावयास मिळाला.

या विषाणूची लागण झाल्यानंतर जनावराला ताप येऊन त्यांच्या अंगावर मोठ-मोठ्या गाठी येऊन त्या गाठी काही दिवसांनी फुटून त्यातून पू निघतो. या विषाणूचा एका जनावरातून दुसर्‍या जनावरांत चावणार्‍या माशा (किटक), डास आणि गोचिड यांच्यामार्फत झपाट्याने प्रसार होतो.

यात विषाणूजन्य विकारात मृत्यूचे प्रमाण 1 ते 5 टक्के असून बाधित होण्याचे प्रमाण हे 10 ते 20 टक्के आहे.

नेवासा तालुक्यात या विषाणूचा संसर्ग जनावरांना झाल्याची माहिती सभापती गडाख यांना होताच तातडीने पशु वैद्यकीय अधिकारी यांच्यासह नगरहून जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील तुंबारे आणि त्यांच्या टीमला गोधेगाव याठिकाणी पाठविले. त्यांना या गावात सात जनावरांना या विषाणूची लागण झाल्याचे दिसले.

यावेळी डॉ. खपके, डॉ. धुमाळ, (श्रीरामपूर), डॉ. पंडुरे, डॉ. डौले (नेवासा) आणि डॉ. बाळासाहेब सोनवळे (नगर) यांचा समावेश होता. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून उपचार सुरू केले आहे. प्रार्दुभाव झालेल्या भागातील जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. यासह जिल्ह्यात याचा जास्त प्रार्दभाव होवू नयेत, यासाठी लवकर लस खरदीकरून जनावरांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे सभापती गडाख आणि डॉ. तंबारे यांनी सांगितले.

जनावरांचे विलगीकरण आवश्यक : गडाख

सध्या करोनाचा प्रार्दभाव सुरू असून यात करोना रुग्णांना विलग करण्यात येते. त्याप्रमाणे लंपी स्कीन डिसीज झालेल्या जनावरांना देखील करोना रुग्णाप्रमाणे विलग करणे आवश्यक आहे. कारण हा विषाणू एका जनावरातून दुसर्‍या जनावरात सहस प्रवेश मिळवतो. यामुळे बाधित जनावरांनी या आजारांनी ग्रस्त जनावरांचे विलगीकरण करावे असे आवाहन सभापती सुनील गडाख यांनी केले.

औरंगाबाद सीमेवरील गावात फटका : डॉ. तुंबारे

हा आजार मराठवाड्यातून जिल्ह्यात प्रवेश करून पाहत आहे. यापूर्वी बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात याचा मोठा फैलाव झालेला आहे. यामुळे शेतकर्‍यांनी दक्ष राहवे. या आजाराचे लसीकरण केल्यास त्यापासून शेतकर्‍यांच्या पशूधनाचे संरक्षण शक्य असल्यााचे डॉ. तुंबारे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com