पोलिसांंना विद्युतचा अहवाल मिळेना; तपास ठप्प

जिल्हा रुग्णालय अग्नितांडव: 14 जणांचे गेले होते बळी
पोलिसांंना विद्युतचा अहवाल मिळेना; तपास ठप्प

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास विद्युत विभागाने अहवाल न दिल्याने ठप्प झाला आहे. आग लागल्यानंतर पोलिसांनी स्वत:हून फिर्यादी होत येथील तोफखाना पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. एका डॉक्टरसह तिघा परिचारकांना अटक केली होती. यानंतर पुढे या गुन्ह्याचा तपास ठप्प झाला आहे. दरम्यान नव्याने आलेले अहमदनगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास आला आहे. त्यांनी पुन्हा विद्युत विभागाला अहवाल देण्यासाठी स्मरणपत्र देणार असल्याचे सांगितले.

6 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागाला आग लागली होती. या आगीत पहिल्या दिवशी 11 व नंतर उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला होता. एकूण 14 जणांचा यामध्ये मृत्यू झाला तरी सरकारकडून ही बाब आजही गांभीर्याने घेतली गेल्याचे दिसून येत नाही. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या चौकशी समितीने चौकशी करून राज्य सरकारकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालात काय आहे, हे सार्वजनिक केले नाही. अहवाल सादर करून दीड महिना झाला तरी सरकारकडून त्यावर कुठलीच कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.

दुसरीकडे पोलिसांनी आग लागली त्याच दिवशी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात चौघांना अटक केली. सुरूवातीला या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी केला. यानंतर तो गुन्हा उपअधीक्षक अजित पाटील यांच्याकडे वर्ग झाला. यादरम्यान 70 ते 80 जणांचे जबाब नोंदविण्यात आले. सुरूवातीला तपासाला गती होती; पण आता या गुन्ह्याचा तपास ठप्प झालेला दिसत आहे. पोलिसांनी वारंवार मागणी करूनही त्यांना विद्युत विभागाने अहवाल दिलेला नाही.

दरम्यान या गुन्ह्याचा तपास आता उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्याकडे आला आहे. त्यांनी विद्युत विभागाला स्मरणपत्र देण्याचे सांगितले परंतु विद्युत विभागाकडून त्यांना अहवाल मिळून तपासात गती येईल, याची शक्यता कमीच आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com