
जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा जिल्हा विभाजनास पाठिंबा आहे. त्यांनी पुढाकार घेतला तर विभाजनाचा प्रश्न सुटू शकतो असे प्रतिपादन करत आ. राम शिंदे यांनी यांनी जिल्हा विभाजनाचा चेंडू महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कोर्टात टोलवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला देशात नऊ वर्षे पूर्ण झाली याबद्दल भाजपच्या वतीने रविवारी सकाळी आठ वाजता आ. राम शिंदे यांच्या उपस्थितीत जामखेड येथे 500 मोटार सायकलची रॅली काढण्यात आली. यानंतर अयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना आ. राम शिंदे म्हणाले, अहमदनगर जिल्हा मोठा आहे.
जिल्ह्याचे विभाजन व्हावे यासाठी मी पालकमंत्री असताना प्रयत्न केले. विभाजनास उत्तर व दक्षिण मधील जनतेची इच्छा होती. तत्कालीन विरोधी पक्षनेते व आत्ताचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा विभाजनास पाठिंबा होता. विभाजनाचा अंतिम प्रस्ताव तयार झाला असताना सरकार गेले. आता पुन्हा ही मागणी जोर धरू लागली आहे. आता महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. ते पुढाकार घेतील व त्यादृष्टीने अंमलबजावणी चालू असल्याचे आ. राम शिंदे यांनी सांगितले.