file photo
file photo
सार्वमत

जिल्ह्यात गंदगीमुक्त अभियान सुरू

आज ऑनलाईन स्पर्धा, उद्या आरोग्य केंद्र, अंगणवाडीच्या इमारती करणार निर्जंतुकीकरण

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सध्या सर्वत्र करोनाचे संकट असल्याने वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता करण्यासाठी आणि नागरिकांच्या स्वभावात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘गंदगीमुक्त गाव अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाला जिल्ह्यात सुरूवात झाली असून आज (बुधवारी) श्रमदान, उद्या ऑनलाईन स्पर्धा आणि त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाडी इमारत निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. हे अभियान गावकर्‍यांनी यशस्वी करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी केले आहे.

केंद्र व राज्य शासनाच्यावतीने जिल्ह्यात 8 ते 15 ऑगस्ट या कालावधीत कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव वैयक्तिक सार्वजनिक स्वच्छताबाबत लोकांच्या स्वभाव परिवर्तनासाठी गंदगीमुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान गावस्तरावर सरपंच, ग्रामसेवक व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन यशस्वी करावे.

या अभियांनाचा शुभारंभ 8 तारखेला गावातील नागरीकांसोबत ई-संवाद बैठकीतून झाला. 9 ऑगस्ट रोजी ग्रामस्तरावर पुनर्वापर न होणार्‍या प्लास्टीक कचर्‍याचे संकलन करून वर्गीकरण करण्यात येणार आहे. 10 ऑगस्टला ग्रामस्तरावर शासकीय इमारतीची स्वच्छता करण्यात आली. 11 ऑगस्ट रोजी स्वच्छतापर संदेश देणारी भिंतीचित्रे रंगवून जनजागृती करण्यात आली. आत (दि.12) श्रमदानातून वृक्षारोपणाची मोहीम राबविण्यात येणार आहे.

उद्या (दि.13) गंदगीमुक्त मेरा गाव या विषयावर ऑनलाईन स्पर्धा (इ.6 वी ते 8 वी) तसेच याच विषयावर ऑनलाईन निबंध स्पर्धा (इयत्ता 9 वी ते 12 वी)हा उपक्रम शालेय स्तरावर राबवायचा आहे.

14 तारखेला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र यांची स्वच्छता करून औषध फवारणीव्दारे निर्जंतुकीकरण करावयाचे आहे. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गावात ग्रामसभेमध्ये शाश्वत स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शौचालय बांधकामात राज्याचे व जिल्ह्याचे काम उत्कृष्ट आहे.

गावात शाश्वत स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी शौचालयाच्या वापरासह परिसर स्वच्छता ठेवल्यास ग्रामिण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावेल यासाठी हे अभियान उपयोगी पडेल. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या अभियानातील उपक्रम राबविण्यात यावे व ग्रामपंचायतमधील सरपंच व ग्रामसेवक यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन परीक्षीत यादव उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) जिल्हा परिषद यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com