अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

किरकोळ कारणातून झालेल्या वादात दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी मतीन गफार शेख व मोबीन गफार शेख (दोघे रा. इंदिरानगर, कोठी, नगर) यांना

जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातु यांनी दोषी धरून 10 वर्षे सक्तमजुरी व 1 लाख 2 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंडातील 67 हजार 900 रूपये जखमींना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

27 एप्रिल 2012 रोजी कलीम जहागीरदार, शेख वसीम शेख अजीज व त्यांचे मित्र हे मतीन शेख याच्या अहमदनगर कॉलेज गेटवरील चायनिज गाडीवर जेवणासाठी गेले होते. जहागीरदार यांनी जेवणाची ऑर्डर दिली. परंतू, बराच वेळ झाल्यानंतरही जेवण न आल्याने पार्सल देण्याचे जहागीरदार यांनी मतीन शेख याला सांगितले.

याचा राग आल्याने मतीन शेख व मोबीन शेख यांनी जहागीरदार व त्यांचा मित्र वसीम शेख यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी जहागीरदार यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात भादवि 307 सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बी. एस. नागरगोजे यांनी करून न्यायायलात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाच्यावतीन वकील मोहन कुलकर्णी यांनी काम पाहिले.

सरकारी पक्षाच्यावतीने एकुण 7 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेला साक्षी, पुरावे व सरकारी पक्षाच्या युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली आहे.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला सक्तमजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देणार्या एकाला एक वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

सुनील रामदास सोनवणे (वय 22 रा. राळेगण थेरपाळ ता. पारनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी हा निकाल दिला.

पारनेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा 14 मार्च 2018 रोजी 10 वीचा पेपर होता. पेपर देण्यासाठी संबंधित मुलगी शाळेमध्ये पोहचल्यानंतर ती मैत्रिणीसोबत झाडाखाली अभ्यास करत बसली होती. यावेळी सुनील सोनवणे हा दुचाकीवरून त्याठिकाणी आला. तो संबंधित मुलीला म्हणाला, माझे तुझ्यावरती प्रेम आहे, असे म्हणत त्याने दुचाकीवर तिच्या भोवती चकरा मारून तो निघून गेला. पेपर संपल्यानंतर पिडीत मुलीने झालेली घटना तिच्या वडिलांना सांगितली.

पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात सोनवणे विरोधात भादवि कलम 354, 354 (ड), पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार एस. ई. मातोंडकर यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाच्यावतीने वकील डी. आर. दळवी यांनी काम पाहिले.

सरकारी पक्षाच्यावतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेले साक्षी, पुरावे व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सोनवणे याला शिक्षा ठोठावली आहे. 10 हजार रूपये पिडीत मुलीला देण्याचे आदेशात पारीत केले आहे.