अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील 705 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवार (दि.15) मतदान झाले असून सोमवार (दि.18) रोजी मतमोजणी होणार आहे.

या मतमोजणीच्या ठिकाणे संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी निश्चित केली असून त्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिली आहे.

त्यानुसार अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी 8 वाजता तहसील कार्यालय याठिकाणी होईल. संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी 10 वाजता मातोश्री मालपाणी विद्यालय याठिकाणी, कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी 9 वाजता, राहाता तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी राहुरी कॉलेज येथे सकाळी 9 वाजता, श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत श्रीरामपूर येथे सकाळी 9 वाजता, नेवासा तालुक्यातील मतमोजणी शासकीय गोडावून मुकिंदपूर या ठिकाणी सकाळी 10 वाजता, नगर तालुक्यातील मतमोजणी पाऊलबुधे विद्यालय सावेडी येथे सकाळी 9 वाजता, पारनेर तालुक्यातील मतमोजणी तहसील कार्यालय येथे सकाळी 10, पाथर्डी तालुक्यातील मतमोजणी तहसील कार्यालयात सकाळी 9 वाजता, शेवगाव तालुक्यातील मतमोजणी तहसील कार्यालयात सकाळी 9 वाजता, कर्जत तालुक्यातील मतमोजणी नवीन तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजता, जामखेड तालुक्यातील तहसील कार्यालय येथे सकाळी 8 वाजता, श्रीगोंदा तालुक्यातील मतमोजणी शिवाजी महाविद्यालय दौंड रोड या ठिकाणी सकाळी 9 वाजता होणार आहे.

विजयी मिरवणुकीस बंदी

705 ग्रामपंचायतीची मतमोजणी उद्या (सोमवार) होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी करण्यास तसेच मतमोजणी झाल्यानंतर विजयी मिरवणूका काढण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे. मुंबई पोलीस अधिनियमानुसारही स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. सध्या करोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढत असून, अशा वेळी नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याकरिता नागरिकांनी एकत्रित जमावाने येण्याचे टाळणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी करू नये, तसेच विजयी मिरवणुका काढण्यात येऊ नये. नागरिकांनी आपल्या घरी बसून प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूक निकालाची माहिती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.