नूतन अध्यक्ष कर्डिलेंकडून 700 पदभरतीची घोषणा

जिल्हा सहकारी बँक || स्व. भाऊसाहेब थोरातांना अभिवादन करून स्वीकारला पदभार
नूतन अध्यक्ष कर्डिलेंकडून 700 पदभरतीची घोषणा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्हा सहकारी बँकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यावर बँकेच्या सभागृहात ज्येष्ठ नेते (स्व.) भाऊसाहेब थोरात यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यावर बँकेचे नवे अध्यक्ष भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार मंगळवारी (दि.14) दुपारी स्वीकारला. यानंतर पत्रकारांशी बोलताना पहिल्या टप्प्यात बँकेतील 700 रिक्त जागांची भरती करण्याची घोषणा त्यांनी केली.

या भरतीबाबत विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठवला आहे व ही भरती शासनाद्वारे होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांना भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ही भरती जरी बँकेमार्फत झाली, तरी ती पारदर्शकपणे करण्यावर भर राहील, असेही सांगितले.

आठ दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत कर्डिले यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा अवघ्या एक मताने पराभव करून बँकेचे अध्यक्षपद पटकावले. त्यानंतर त्यांनी मंगळवारी या पदाचा पदभार स्वीकारला. बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी या पदभाराच्या अनुषंगाने आवश्यक प्रक्रियापूर्ण केली. यावेळी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के, सीताराम गायकर, प्रशांत गायकवाड, संचालिका अनुराधा नागवडे, अमित भांगरे, अंबादास पिसाळ, अमोल राळेभात आदींसह माजी संचालक संपत म्हस्के, रावसाहेब पाटील शेळके, दत्तात्रय पानसरे तसेच बाळासाहेब साळुंके, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, मीनाक्षीताई पठारे, सुरेश पठारे, बाळासाहेब भोसले, प्रेमाकाका भोईटे, ईश्वरराव कदम, शंकर राजळे, अ‍ॅड. सुभाष पाटील, रामभाऊ लिपटे, सुरेश साळुंखे, अशोक देशमुख, डी.डी.आर, गणेश पुरी, रामसिंग काळे, वंदनाताई पवार, तुषार पवार, अक्षय कर्डिले, रावसाहेब म्हस्के, राजेंद्र चोपडा आदी उपस्थित होते.

पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नूतन अध्यक्ष कर्डिले म्हणाले, जिल्हा बँकेच्या सुमारे 1 हजार 200 हून अधिक जागा रिक्त आहेत. राष्ट्रीयीकृत व खासगी बँका आता ग्राहकांच्या दारात जात आहेत. या तुलनेत जिल्हा बँकेच्या जिल्हाभर शाखा असल्या तरी पुरेसे कर्मचारी नाहीत. त्यामुळे शेतकरी सभासदांना विविध सेवा देण्यास अडचणी येतात. म्हणून पहिल्या टप्प्यात 700 जागा व दुसर्‍या टप्प्यात 500 जागा भरण्याचे नियोजन आहे. राज्य सरकारच्या यंत्रणेद्वारे ही भरती करण्याचा प्रयत्न आहे व तशी झाली नाहीतर बँकेद्वारे पारदर्शीपणे केली जाईल व या भरतीमध्ये महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यातील उमेदवारांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल, असे अध्यक्ष कर्डिले यांनी जाहीर केले.

परंपरा कायम राखणार

सहकार महर्षी (स्व.) भाऊसाहेब थोरात यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. तसेच बँकेच्या विकासात योगदान देणारे बँकेचे संचालक, माजी संचालक, जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचा सत्कार करण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते धनंजयराव गाडगीळ, पद्मश्री विठ्ठलराव विखे, भाऊसाहेब थोरात, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, आबासाहेब निंबाळकर, मारुतराव घुले, यशवंतराव गडाख आदींसह अन्य ज्येष्ठ नेत्यांनी बँकेत रुजवलेली राजकारण विरहित कारभाराची परंपरा अशीच पुढेही सुरू राहील व शेतकरी, कारखानदार, व्यावसायिक व बचत गट यांना मदत केली जाईल, अशी ग्वाही देऊन अध्यक्ष कर्डिले म्हणाले, राहुरी कारखान्यांचे व्हॅल्युएशन काढण्याची प्रक्रिया सुरू असून, ती झाल्यावर हा कारखाना चालवण्यास देण्याचा निर्णय करणार आहोत. कारखाना सुरू व्हावा, यासाठीच प्रयत्न केले जाणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्ह्यात 14 साखर कारखाने आहेत व मी कारखानदार जरी नसलो तरी हे सर्व कारखाने सुरळीत चालावे यासाठी माझे नेहमी प्रयत्न राहिले आहेत. कारखान्यांच्या मदतीबाबत बँकेच्या संचालक मंडळात काही मतभेद झाले, पण मी पुढाकार घेऊन मदत केली म्हणून मी बँकेचा अध्यक्ष झालो, असे सूचक भाष्य त्यांनी अगस्ती कारखान्याच्या मदत निर्णयाच्या अनुषंगाने केले.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात अशी दोन पॅनेलची लढत होणार होती व त्यात देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले होते. पण आम्ही त्यांना जाऊन भेटलो व बँकेची परंपरा राजकारण विरहित कारभाराची असल्याचे सांगितल्यावर त्यांनी परवानगी दिली. त्यानंतर माझ्यासह बहुतांश संचालक आ. बाळासाहेब थोरात- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पॅनेलचे चिन्ह घेऊन लढले, 90 टक्के बिनविरोधच झाले. अशा स्थितीत महाविकास आघाडीच्या थोरात-पवारांनी बँकेच्या अध्यक्षपद निवडणुकीच्या बैठकीस आम्हाला बोलावणे अपेक्षित होते. पण जाणीवपूर्वक आम्हाला बाजूला ठेवण्याचा त्यांचा हेतू दिसल्याने त्याची माहिती आम्ही उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. तसेच, भविष्यात बँकेच्या कारभारात महाविकास आघाडी आम्हाला सहकार्य करील की नाही, या शंकेने फडणवीस यांच्या आदेशाने व विखे पिता-पुत्रांच्या मदतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असे अध्यक्ष कर्डिलेंनी आवर्जून स्पष्ट केले.

घुलेंसह सर्वांना फोन केले...

बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकारण झाले असले तरी भविष्यात बँकेच्या कारभारात राजकारण नको व जुन्या जाणत्यांनी घालून दिलेल्या पायंड्यानुसार कारभार चालावा म्हणून आजी-माजी संचालकांच्या सत्कार समारंभास येण्यासाठी चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले बंधूंना मी फोन केले. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना समक्ष भेटलो. शंकरराव गडाख, आशुतोष काळेंसह सर्व 19 संचालकांना फोन केले, असे सांगून कर्डिले म्हणाले, त्यांनी आयोजित केलेला मेळावा संपल्यावर येतो, असे घुले म्हणाले होते. अन्य मंडळींनीही येण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे ते नक्कीच येऊन मला भेटतील, असा विश्वासही कर्डिलेंनी व्यक्त केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com