जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची तातडीने नोंदणी करणार

बांधकाममंत्री दिलीप वळसेपाटील यांचे आश्वासन
जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची तातडीने नोंदणी करणार

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

असंघटीत बांधकाम कामगारांना करोनाच्या पार्श्वभुमीवर सवलती देण्याची घोषणा केली मात्र शासकीय यंत्रणा सहकार्य करत नसल्याच्या तक्रारीची कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी दखल घेऊन राज्याचे कामगार आयुक्त श्रीरंग यांना लक्ष घालून नगर जिल्ह्यातील कामगारांचे नुतनीकरण व नोंदणी तातडीने करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी दिली.

डॉ. घुले यांनी ना. वळसे यांच्याकडे हेळसांडीची व अडवणुकीची कैफीयत मांडत तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली होती. नामदार श्री. वळसे यांना केलेल्या मागणीत डॉ. घुले यांनी सांगितले होते की कोव्हिडमुळे जी असामान्य परीस्थिती उद्भवली आहे ती तर सर्वश्रृत आहे,

दोन हजारांसाठी जानेवारी 2020 ला नुतनीकरण हवे तर तीन हजार रुपये करिता मार्च 2020 ला नुतनीकरण हवे. सध्या नगरचे सहाय्यक कामगार आयुक्त हे नुतनीकरण ऑनलाईन करा असे सांगतात परंतु त्यासाठी आवश्यक असलेले पाठबळ मात्र देत नाहीत. नोंदणीसाठी आयडी, पासवर्ड दिला जात नाही. मग मजुरांचे नुतनीकरण होणे अशक्य असल्याने त्यांना या योजनेचा फ़ायदाही मिळणे अवघड झाले आहे.

हीच अवस्था नविन नोंदणीची आहे. यासंदर्भात अनेकदा कामगार कार्यालयाकडे पाठपुरावा करूनही पदरी निराशाच येत असल्याने अशीच अनास्था व तांत्रिक अडचणी कार्यालयाकडून सुरू राहिल्यास कामगारांचे कल्याण कसे साध्य होईल हा प्रश्न आहे.

या गंभीर प्रश्नात आपण लक्ष घालून असंघटीत कामगारांनी न्याय द्यावा अशी मागणी केली होती. नामदार वळसे पाटील यांनी या मागणीची तातडीने दखल घेऊन राज्याचे कामगार आयुक्त श्रीरंग यांना लक्ष घालण्याच्या सूचना केल्या. आयुक्त श्रीरंग यांनी समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्याशी संपर्क साधून नगर कार्यालयाला सूचना दिलेल्या असून तातडीने कामगारांची नोंदणी प्रक्रीया पूर्ण केली जाणार असल्याचे सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com