देवळाली प्रवरात 100 खाटांच्या कोविड सेंटरला जिल्हाधिकार्‍यांचा ‘ग्रीन सिग्नल’

पालिकेच्या ऑनलाईन प्रभागनिहाय बैठकीत नगराध्यक्षांची माहिती; तिसर्‍या लाटेसाठी सज्जता
देवळाली प्रवरात 100 खाटांच्या कोविड सेंटरला जिल्हाधिकार्‍यांचा ‘ग्रीन सिग्नल’
File Photo

देवळाली प्रवरा (वार्ताहर) - करोना महामारीची तिसरी लाट येऊ घातली आहे. विशेषकरून त्या लाटेचा प्रभाव लहान मुलांवर होण्याची शक्यता आहे. असे तज्ज्ञांचं मत आहे. त्या दृष्टीने 100 खाटांचे कोव्हिड सेंटर उभारण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून हिरवा कंदिल मिळाला असून लवकरच हे कोव्हिड सेंटर उभे राहणार आहे, असे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले.

देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे प्रभाग निहाय दक्षता समितीची आढावा बैठक नगराध्यक्ष कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये प्रत्येक प्रभागातील आजवर रॅपिड अँटीजन चाचणी घेण्यात आल्या आहेत. त्यातील बाधित आढळून आलेले रुग्ण संख्या त्यांच्या कुटूंबातील व संपर्कात आलेल्या नागरिकांची करोना चाचणी करुन घेतल्या आहेत का? बाधित सापडलेल्या रुग्णांना क्वॉरंटाईन सेंटर येथे किंवा रुग्णालयात दाखल केले आहे का? कॉन्टॅक्ट ट्रेसिंग योग्यरित्या होते का? याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. बैठकीस मुख्याधिकारी अजित निकत, बन्सी वाळके, एम.एस पापडीवाल आदी उपस्थित होते. ऑनलाईन बैठकीत नगरसेवक दोन कर्मचारी, एक शिक्षक असे नऊ प्रभागाचे दक्षता समिती सहभागी झाले होते.

नगराध्यक्ष कदम म्हणाले, तिसरी लाट येऊ घातल्याने 100 बेडचे कोविड सेंटर उभारण्याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. प्रभागनिहाय रॅपिड टेस्ट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नगरपरिषदेचे फिरते करोना रॅपिड अँटीजन चाचणी पथक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील रॅपिड व आर.टी.पी.सी.आर टेस्टसाठी नागरिकांना प्रोत्साहन देणे, नागरिकांनी सामाजिक अंतर, मास्क आदी नियमांचे पालन करण्यासाठी नगरसेवक व दक्षता समितीने पुढाकार घ्यावा. माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाचा आढावा घेण्यात आला.

तिसर्‍या लाटेच्या अनुसंगाने देवळाली प्रवरा शहरात विना मोबदला 100 खाटांचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविलेला प्रस्तावाबाबत विचार विनिमय करण्यात आला. 100 खाटांच्या सेंटरसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून मनुष्यबळ उपलब्ध करुन घेणे, प्रभागनिहाय विलगीकरणाची व्यवस्था निर्माण करणे, किराणा दुकानात गर्दी टाळण्यासाठी मोबाईलवर यादी पाठवून घरपोहोच सुविधा उपलब्ध करण्यासाठी दक्षता समितीने पुढाकार घेऊन किराणा व्यावसायिक व नागरिकांना प्रवृत्त करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या ऑनलाईन बैठकीत सर्व नगरसेवक व प्रभागनिहाय समितीच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com