
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष पद निवडीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. अध्यक्षांची निवड प्रक्रिया करण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्याकडे नवीन अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पाठवण्याची मागणी केली आहे. तसा ठराव करून मागील आठवड्यात सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला असून महिनाभरात बँकेच्या नवीन अध्यक्षांची निवड होणार आहे. दरम्यान, अध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे असल्याने माजी चेअरमन सीताराम पाटील गायकर, माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील आणि माजी आ. राहुल जगताप यांच्या चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेत सर्वपक्षीय सत्ता असली तरी बँकेच्या राजकारणात आ. बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे विरोधीपक्ष नेते आ. अजित पवार आणि आ. थोरात हे ज्यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवतील त्यांनाच जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद मिळणार आहे. यामुळे हे पद आपल्याला मिळावे, यासाठी राष्ट्रवादीच्या संचालकांमध्येच स्पर्धा होणार आहे.
बँकेच्या अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार असणार्या नावात संचालक तथा माजी अध्यक्ष गायकर यांच्यासह संचालक घुले यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. मात्र, घुले यांना विधान परिषदेची देखील आस असल्याने, तसेच वर्षभरापूर्वी मुदत संपलेल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांच्या घरात होते. यामुळे पुन्हा ते जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी आग्रही आहेत, की नाही याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. मात्र, बँकेतील राष्ट्रवादीच्या गोटात त्यांच्या नावाची चर्चा आहे.
दुसरीकडे गायकर हे माजी अध्यक्ष असले तरी त्यांच्या नावाची देखील अध्यक्षपदासाठी स्पर्धा सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, वाढते वय, अगस्ती कारखान्यांचा डोलारा संभाळण्यासोबत जिल्हा बँकेची धुरा पेलणार की ऐनवेळी माघार घेणार यासाठी काही दिवस वाट पाहवी लागणार आहे. तर श्रीगोंद्याचे संचालक माजी आ. राहुल जगताप मागील वेळी अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. मात्र, ऐनवळी पवार यांनी आपले पत्ते खुले करत दिवंगत उदय शेळके यांच्या खांद्यावर जिल्हा बँकेची धुरा सोपवली. आता त्यांच्या अचानक जाण्याने पुन्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील वेळी अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी ज्येष्ठ या तत्त्वावर अध्यक्षपदावर संचालक भानुदास मुरकुटे यांनी दावा केला होता. मात्र, पक्षीय राजकारणात त्यांच्या मागणीकडे सर्वांनी दुर्लक्ष केल्याचे जिल्ह्याने पाहिलेले आहे. मागील आठवड्यात संचालक मंडळाने ठराव करुन अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम तयार करून देण्याची मागणी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्याकडे केली आहे. येत्या महिन्यांभरात हा कार्यक्रम तयार होवून बँकेला मिळणार असून त्यानंतर पुन्हा अध्यक्ष पदासाठी जोरदार लॉबिंग होणार आहे. यात कोणाची लॉटरी लागणार यासाठी वाटप पाहवी लागणार आहे.
गतवेळे प्रमाणेच यंदाही झटका
गतवेळी अध्यक्ष निवडीच्या काही दिवस आधी इच्छुक संचालक लॉबिंग करण्यासाठी कमालीचे सक्रिये झाले होते. मात्र, ऐनवेळी आ. पवार आणि आ. थोरात यांनी जोरका झटका हळूच देत दिवंगत शेळके यांना अध्यक्ष केले होते. यंदा देखील नेते अशाच पध्दतीने अध्यक्ष नेमणार की तरूणांना संधी देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.