
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली बहुचर्चित नीट परीक्षा राज्यभरात रविवारी पार पडली. जिह्यातील 25 केंद्रावर नीट परीक्षा घेण्यात आली.
जिल्ह्यातून 9 हजार 170 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. करोना सावट असतानाही 7 हजार 705 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर 1 हजार 465 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन नुसार ही परीक्षा शांततेत पार पडली असल्याची माहिती नीटचे जिल्हा समन्वयक शिरील पंडीत यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) घेण्याचा मार्ग मोकळा झाला. एकाच सत्रात, एकाच दिवशी ही परीक्षा येण्याचे ठरविण्यात आले होते.
करोनाचे सावट असल्याने व जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात रूग्ण वाढत असल्याने नॅशनल टेस्टिंग एजन्सी व जिल्हा प्रशासनासमोर नीट परीक्षा घेण्याचे मोठे अवाहन होते. परीक्षेच्यावेळी कोणाही गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून केंद्राच्या बाहेर त्या-त्या उपविभागीय कार्यालयांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले होते.
जिल्ह्यातील 25 केंद्रावर झालेल्या परीक्षेदरम्यान, करोना संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. सर्व केंद्र सॅनिटायझर करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना दुपारी अकरा ते दीड यावेळेत प्रवेश देण्यात आला. करोनाची वाढती संख्या पाहता योग्य खबरदारीचे उपाय म्हणून नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सर्व उपाययोजना करून प्रत्येक केंद्रावर सोशल डिस्टन्सिंग पाळत विद्यार्थी परीक्षेसाठी बसविले होते.
टप्याटप्याने ठराविक विद्यार्थ्यांना आत प्रवेश दिला जात होता. थर्मल स्क्रिनिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर केला जात होता. केंद्रावर दोन जणांमध्ये किमान 6 फुटांचे अंतर ठेवण्यात आले होते.