कर्डिलेंच्या पुढारपणामुळे जिल्हा बँक अध्यक्ष कासावीस

पीक कर्जाच्या मर्यादावाढीवर दिले स्पष्टीकरण
कर्डिलेंच्या पुढारपणामुळे जिल्हा बँक अध्यक्ष कासावीस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पीक कर्जाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय जाहीर करण्यावरून बँकेचे संचालक तथा माजी आ. शिवाजी कर्डिले यांनी केलेल्या पुढारपणामुळे ऐन उन्हाळ्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके राजकीयदृष्ट्या कासावीस झाले आहेत. त्यामुळे हा निर्णय कसा आणि का घेतला, यासह अशा निर्णयांसाठी आपले नेते कसे मार्गदर्शन करतात, हे सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

जिल्हा बँकेत माजी आ. शिवाजी कर्डिले लुडबुड करतात, असा आक्षेप अनेक संचालक खासगीत बोलताना घेतात. बँकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र अनेकदा बँकेच्या निर्णयांवर कर्डिलेंचा प्रभाव असल्याचा प्रचार त्यांचे समर्थक करताना दिसतात. त्यामुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष बोटचेपे असल्याची चर्चा सहकार वर्तुळात झडत असते. मात्र यावेळी अध्यक्ष शेळके यांनी थेट कर्डिलेंना लक्ष्य केले आहे. अध्यक्षांचे हे स्पष्टीकरण आंतरात्म्याचा आवाज आहे की नेत्यांनी कान उपटल्यामुळे आलेली उपरती, हे मात्र स्पष्ट नाही.

बँकेने माध्यमांना पाठविलेल्या पत्रकानुसार, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत शेतकर्‍यांना मदत करण्याच्या अनुषंगाने एकरी कर्ज मर्यादेत वाढ करण्याचा विषय संचालकांनी मांडला. पीक कर्जाच्या जोडीने पशुधनासाठीच्या कर्जाचा विषयही मांडला गेला. शेतकरी हिताचे निर्णय जिल्हा बँकेने सातत्याने घेतले असून यापुढच्या काळातही बँकेची तीच भूमिका राहणार असल्याचे स्पष्टीकरण बँकेचे अध्यक्ष शेळके आणि उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी दिले.

शेतकरी हिताचे निर्णय घेण्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायमच आम्हाला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेत कामकाज केले जात आहे. पीक कर्जाची एकरी मर्यादा वीस हजाराहून तीस हजार करण्याचा निर्णय त्यामुळेच आम्ही सर्व संचालकांच्या मागणीनुसार आणि चर्चेनुसार घेतला असल्याचे अध्यक्ष शेळके यांनी सांगितले.

सर्व संचालकांची सुचना

जिल्हा बँकेने शेतकर्‍यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पीक कर्जाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कर्ज मर्यादा एकरी वीस हजारावरून तीस हजार करण्याबाबत सर्व संचालकांनी सुचना केल्या आणि त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्याचे श्रेय कोणा एका संचालकाला नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हा बँकेच्या अध्यक्षांनी पत्रकाद्वारे दिले आहे.

हा घाव कुणाला ?

काही तालुक्यांमध्ये गरज नसताना पशुपालनासाठी कर्ज वाटले गेले असून त्यांची थकबाकी वाढत चालली असल्याबद्दल आपणास चिंता असल्याचे शेळके यांनी स्पष्ट केल्याचे बँकेने पत्रात म्हटले आहे. पशुपालन कर्ज वाटप झालेले काही तालुके पुढील दोन-तीन वर्षे शेती कर्जाला मुकण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. अप्रत्यक्ष इशारा त्यांनी तालुक्याच्या आडून कोणत्या नेत्यांना दिला, याचीही चर्चा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com