अहमदनगर | Ahmednagar

आशिया खंडात सहकार क्षेत्रात अग्रेसर असणार्या नगरच्या जिल्हा सहकारी बँकेच्या गत 63 वर्षात झालेल्या निवडणुका

या पक्षीय राजकारण विरहित आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून लढल्या गेल्या आहेत. तत्कालीन निवडणुकांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यावेळच्या नेतृत्वाने कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी स्वत: संचालक मंडळाच्या निवडणुकीतून माघार घेऊन अथवा संचालकपदाचा राजीनामा देऊन कार्यकर्त्यांना संधी दिल्याची उदाहरणे आहेत.

यामुळे खर्याअर्थाने जिल्हा बँकेत ग्रामीण नेतृत्वाला संधी मिळाली. हिच परंपरा आतापर्यंत सुरू असून यामुळे अकोल्यासारख्या आदिवासी भागातील सीताराम पाटील गायकर हे अध्यक्षपदावर विराजमान आहेत. 1956 मध्ये महाबळेश्वरच्या अधिवेशनात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या आर्थिक परिवर्तनासाठी कृषी औद्योगिक संकल्पना मांडली.

यात त्रिस्तरीय अर्थपुरवठा करण्यासाठी राज्य बँक, जिल्हा बँका आणि विविध कार्यकारी सोसायटीची संकल्पना स्विकारण्याचा निर्णय झाला. त्यावेळी योगायोगाने राज्याचे सहकार मंत्री हे नगरचे सुपुत्र बाळासाहेब भारदे होते. त्यांच्या माध्यमातून दिवंगत माजी खा. मोतिभाऊ फिरोेदीया यांच्या नेतृत्वाखाली बँकेची मुहूर्तमेढ रोवली गेली. 1957 ला जिल्हा बँकेची स्थापना होऊन त्यानंतर प्रत्यक्षात 1958 पासून बँकेच्या कामकाजाला सुरूवात झाली.

सुरूवातीपासून बँकेच्या निवडणुका या पक्ष विरहित झालेल्या आहेत. जिल्ह्यातील नेतृत्वांनी गट करून एकमेकांना आव्हान दिले. मात्र यात पक्षीय झेंड्याला थारा देण्यात आला नाही. यामुळे तत्कालीन सत्ताधारी मंडळाने नगर तालुक्यातून कम्युनिस्ट पक्षाचे नामदेवराव आव्हाड यांना तर शिवसेनेत असतानाही सबाजीराव गायकवाड यांना बँकेवर निवडून आणल्याचे उदाहरण आहे..

अलिकडच्या काही वर्षापूर्वी शिवाजीराव कर्डिले भाजपमध्ये असताना तत्कालीन सत्ताधारी मंडळाने कर्डिले यांना उमेदवारी दिली होती. पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, अण्णासाहेब शिंदे यांनी बँकेचे नेतृत्व तात्कालीन ग्रामीण चेहरा असणार्या पद्मश्री विखे पाटील यांच्याकडे दिले. तीच परंपरा आजपर्यंत सुरू आहे.

आतापर्यंत झालेले चेअरमन

मोतीभाऊ फिरोदिया, का. भि. रोहमारे, सा.या. पाटील, भाऊसाहेब थोरात (दोनदा), विठ्ठलराव विखे पाटील, के. भि. हारदे, विठ्ठलराव विखे पाटील, भाऊसाहेब थोरात (दोनदा), विठ्ठलराव विखे पाटील, मारूतराव घुले पाटील (दोन), दा.श. रोहमारे, कि. रा. हराळ, भा.म. हांडे, रावसाहेब पाटील साबळे (दोनदा), मारूतराव घुले (पाच वेळा), मा.दे.शेळके, आबासाहेब निंबाळकर, यशंवतराव गडाख (दोनदा), भाऊसाहेब थोरात (चार वेळा), यशंवतराव गडाख (चार वेळा), ज्ञा. दौ. पठारे, राधाकृष्ण विखे पाटील (दोनदा), शंकरराव गडाख, शिवाजीराव कर्डिले, पांडुरंग अभंग (दोनदा), बाजीराव पाटील खेमनर (चार वेळा), सीताराम पाटील गायकर यांचा समावेश आहे.

हे तीन कार्यक्रम नेत्रदीपक

बँकेचा रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव समारंभ नेत्रदीपक ठरला आहे. यासह बॅँकेच्या मालकीच्या असणार्या आणि नगर जिल्ह्यातील अनेक राजकीय, सामाजिक, साहित्यिक कार्यक्रमांचा एकमेव साक्षीदार असणार्या सहकारी सभागृहाचा नूतनीकरण आणि नामकरण साहेळा मोठ्या थाटात झाला आहे. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष यशवंतराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.

या कार्यकर्त्यांना मिळाली संधी

जिल्हा बँकेत नेत्यांमुळे दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळाली. यात रामभाऊ आबनावे, पांडुरंग अभंग, प्रभाकर रुपवते, प्रभाकर भोर, कारभारीमामा चौधरी, बाळासाहेब पाटील गुंजाळ, रवींद्र मासाळ यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

संचालकांची संख्या घटली

पूर्वी बँकेच्या संचालक मंडळाची संख्या 27 होती. मात्र, सहकार खात्यातील घटना दुरूस्तीनंतर बँकेच्या संचालक मंडळात घट झाली. आता बँकेसाठी आता 21 संचालक असून पूर्वी असणारे व्यक्तिगत मतदारसंघ, पणन, प्रक्रिया, डेअरी-पोल्ट्री, दुर्बल घटक हे मतदारसंघ कमी करण्यात आले, तर महिला मतदारसंघातील संचालकांची संख्या घटविण्यात आली. यामुळे बँकेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना तालुकानिहाय संधी देताना कसरत करण्याची वेळ आली आहे. यासह सहकार खात्याच्या किचकट नियमांमुळे गत पंचवार्षिक निवडणुकीत असणारी सहा हजार मतदारांची संख्या आता साडेतीन हजारांवर आली आहे. सहकार खात्याच्या किचकट नियमांमुळे अनेक सहकारी संस्था अवसायानात निघाल्याचा हा परिणाम आहे.

उच्च शिक्षित संचालक

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात आतापर्यंत सामान्य संचालकांसोबत उच्च शिक्षितांना देखील संचालक होण्याचा मान मिळालेला आहे. यात डॉक्टर, इंजिनिअर, सीए, कृषी पद्वीधर यांचा समावेश आहे. यामुळे बँकेच्या संचालक मंडळाला तसेच चेअरमन, व्हाईस चेअरमन पदावरील व्यक्तींना राजकीय, सामाजिक यासह शैक्षणिक वारसा आहे.

हे किंगमेकर संचालक झाले नाहीत

1964-65 ला जिल्हा बँकेच्या कामगार युनियनचे अध्यक्ष असणारे बाळासाहेब विखे पाटील हे कधीच बँकेचे संचालक झाले नाही. यासह गोविंदराव आदिक, तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब भारदे, अनेक वर्षे मंत्री असणारे संगमनेरचे बी.जे. खताळ आणि आता अनेक वर्षे मंत्री आणि बँकेच्या राजकारणाचे किंगमेकर असणारे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना बँकेच्या संचालक पदाचा मोह कधी दिसून आला नाही.

गोबर गॅसचे काम देशपातळीवर

आप्पासाहेब राजळे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जिल्हा बँक आणि जिल्हा परिषदेने गोबर गॅस योजना राबविली होती. ही योजना राज्यात नव्हे, तर देश पातळीवर यशस्वी ठरली होती. यामुळे बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला होता.

चार दशकांहून अधिक थोरातांची पकड

जिल्हा बँकेवर संगमनेरचे तत्कालीन नेतृत्व भाऊसाहेब थोरात यांचे चार दशकांहून अधिक काळ वर्चस्व राहिलेले आहे. थोरात यांच्याकडे बँकेच्या संचालकपदासह प्रदीर्घ काळ चेअरमनपद राहिलेले आहे. त्यांनी राज्य बँक, नाबार्ड आणि आरबीआयवर ‘रुमने’ मोर्चा काढून सामान्य माणसाला अर्थपुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न केला होता. यासह बँकेचे चेअरमन पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील असताना त्यांच्या संचालक मंडळात भाऊसाहेब थोरात यांनी व्हाईस चेअरमन पदावर काम केलेले आहे.

संगणकीकृत कामकाज करणारी देशातील पहिली बँक

देशात 1985 ला ज्यावेळी बँकांचे कामकाज संगणकीकृत पध्दतीने सुरू झाले. त्यावेळी देशातील सहकारी बँकांमध्ये नगरच्या जिल्हा बँकेने सर्वप्रथम संगणकीकृत कामकाज सुरू केले. या संगणकीकरणाच्या कामाचा शुभारंभ तत्कालीन नेेते बाबुरावदादा तनपुरे आणि मारूतराव घुले यांच्याहस्ते झाला होता. तेव्हा बँकेच्या संगणकीकृत कामकाजाची बातमी देशपातळीवर 13 भाषेत झळकली होती.

अशी झाली तालुकानिहाय कामे

आतापर्यंत जिल्हा बँकेच्या माध्यमातून कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, राहुरी आणि नेवासा या तालुक्यांत साखर कारखान्यांसोबत सूतगिरण्या, दूध डेअरी, कुक्कुटपालन यातून नगदी व्यवसायाला चालना मिळाली. यामुळे याठिकाणी असणार्या शेतकर्यांचे शेतीसोबत पुरक व्यवसाय उभे राहून त्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम बँकेने केले आहे. संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत या तालुक्यांत उपसा जलसिंचन योजना उभ्या करून जास्तीजास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे काम झाले आहे. पाथर्डी, जामखेड, पारनेर आणि नगर तालुक्यातील शेतकर्यांना वेगवेगळ्या माध्यमातून शेती अर्थसहाय्य देऊन त्यांना उभे करण्याचा प्रयत्न बँकेने केला आहे.

बँकेच्या निवडणुकांची वैशिष्ट्ये

1963-64 मध्ये बँकेत व्यक्तिगत चार मतदारसंघ होते. यामुळे मोतीभाऊ फिरोदीया यांचे सहज बहुमत होत असे. मात्र, हे व्यक्तिगत मतदारसंघ चारवरून एक करण्यासाठी जामखेडचे संचालक सा.या.उर्फ साहेबराव पाटील यांनी लढा देऊन सर्वसाधारण सभेत घटना दुरूस्ती करून या मतदारसंघाची संख्या एकवर आणण्यात यश मिळविले. यामुळे पुढे 1965-66 च्या निवडणुकीत सत्ता बदल होऊन सा.या. पाटील चेअरमन झाले. सुरूवातीला बँकेची संचालक (पंच कमिटी) मंडळाची निवडणूक ही दर तीन वर्षांनी होत होती. मात्र, त्यात बदल करण्यात येऊन 1973 पासून ही निवडणूक दर पाच वर्षांनी झाली. बँकेच्या पहिल्या चार निवडणुका या दर तीन वर्षांनी तर त्यानंतरच्या सर्व निवडणुका या दर पाच वर्षांनी सुरू झाल्या. बँकेतील व्यक्तीगत सभासद मतदारसंघ हा 2011 पर्यंत अस्तित्वात होता. या मतदारसंघातून शेवटचे संचालक प्रकाश फिरोदीया ठरले. पुढे सहकार खात्याच्या घटना दुरूस्तीमध्ये हा मतदारसंघ बिगर शेती मतदारसंघात समाविष्ट झाला. बँकेचे आज व्यक्तीगत सभासद 30 ते 40 असतील.

सहकार खात्याने बँकेच्या संचालक मंडळातील दोन जागा राखीव केल्याने त्या ठिकाणी अॅड. अशोक जोंधळे आणि अकोल्यातून तत्काली सभापती मधूकर पिचड यांना संधी मिळाली. तर संचालक मंडळात महिलांसाठी जागा राखीव केल्याने कोपरगावातून दिवंगत सुशीलाताई शंकरराव काळे, सोनईच्या पुष्पलता अमृतराव काळे आणि वांबोरीच्या शशिकला सुभाष पाटील यांना संधी मिळाली.

या कुटुंबातील सदस्यांना मिळाली संधी

जिल्हा बँकेत अध्यक्ष पदावर अथवा संचालक पदावर घरातील प्रमुख व्यक्तीसोबत त्यांची मुले, पत्नी, नातू, स्नुषा यांना काम करण्याची संधी मिळालेल्यांमध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्यानंतर आ. राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख-आ. शंकरराव गडाख, माजी खा. मोतीभाऊ फिरोदिया-प्रकाश फिरोेदिया, डॉ. बाबूराव दादा तनपुरे-माजी खा.प्रसाद तनपुरे, अरूण तनपुरे, माजी खा. शंकरराव काळे यांच्यानंतर सुशिलाताई काळे, अशोक काळे, पुष्पाताई काळे आणि चैताली काळे, दिवंगत मारूतराव घुले यांच्यानंतर चंद्रशेखर घुले पाटील, माजी मंत्री शंकरराव कोल्हे-बिपिन कोल्हे, आबासाहेब निंबाळकर-राजेंद्र निंबाळकर, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्यानंतर माजी आ. वैभव पिचड, ग. रा. उर्फ रावसाहेब म्हस्के पाटील आणि चंद्रकांत म्हस्के पाटील, आप्पासाहेब राजळे-राजीव राजळे आणि आ. मोनिका राजळे, जयंतराव ससाणे-करण ससाणे, शिवाजीराव नागवडे-राजेंद्र नागवडे, गोपालराव सोले पाटील-पांडुरंग सोले पाटील, अॅड. सुभाष पाटील-शशिकला पाटील यांना बँकेत काम करण्याची संधी मिळाली.

कार्यकर्त्यांसाठी नेत्यांची माघार

1973च्या बँक निवडणुकीत राहुरीचे बाबूराव तनपुरे यांनी आपले समर्थक रावसाहेब पाटील साबळे यांच्यासाठी तत्कालीन खा. शंकरराव काळे यांना माघार घ्यायला लावली. तर 1991 मध्ये शिवाजीराव नागवडे यांच्यासाठी तत्कालीन खा. शंकरराव काळे यांनी स्वत: संचालक पदाचा राजीनामा दिला. साबळे यांच्या रुपाने बँकेला तरूण चेहरा मिळाला आणि पुढे त्यांना बँक अध्यक्ष होण्याचा मानही मिळाला. आबासाहेब निंबाळकर यांनी नगर अर्बन बँकेचे तत्कालीन चेअरमन यांना जिल्हा बँकेत स्थान मिळावे, यासाठी पुढाकार घेऊन स्वत:ऐवजी हेमराज बोरा यांना संधी दिली. मात्र, अलिकडच्या काळात ही सहकारवृत्ती लोप पावली असून मी आणि माझ्याशिवाय काहीच दिसत नसल्याने कार्यकर्त्यांना फारसा वाव नाही. मात्र, यास आजही काही नेते अपवाद आहेत.

मतभेदाचा यांना झाला फायदा

1964 च्या दरम्यान संचालक मंडळात गटातटाचा वाद झाल्याने चेअरमनपदाच्या नावावर एकमत न झाल्याने एक मत फुटले आणि चेअरमनपदी कोपरगावचे तत्कालीन आमदार के.बी.रोहमारे यांना संधी मिळाली, तर व्हाईस चेअरमनपदी नगर तालुक्यातील नामदेव आव्हाड विराजमान झाले. सत्तारूढ पक्षातील गटतटामुळे भाऊसाहेब हांडे, रावसाहेब पाटील साबळे आणि आ. राधाकृष्ण विखे पाटील यांना चेअरमन होण्याची संधी मिळाली. मात्र, दुसरीकडे गत 40 वर्षात निवडणूक संपल्यानंतर संचालक मंडळाने गटतट बाजूला सारून एकमताने निर्णय घेतलेले आहेत. जिल्ह्यातील अन्य राजकीय संस्थामधील विरोधाला विरोध करणे अशी परिस्थिती कधीच बँकेच्या संचालक मंडळात दिसून आली नाही, हेच जिल्हा बँकेच्या राजकारणाचे वैशिष्ट्य आहे.