अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा सहकारी बँकेवर पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाने वर्चस्व राखल्याचे प्रत्यक्ष मतदानाआधीच स्पष्ट झाले.

गुरूवारी दिवसभरात पवार-थोरात गटाचे 12 समर्थक बिनविरोध निवडून आले. नेत्यांनी राबविलेल्या निवडणुकीतील ‘सहकार’ धोरणामुळे ‘सहमती’चं वारं वाहिलं. मातब्बर कुटुंबातील प्रतिनिधी पुन्हा एकदा बँकेत पोहचले. पक्षीय राजकारणाला नेत्यांनी बँक निवडणुकीत थारा दिला नाही, हे देखिल दिवसभरातील घडामोडींनी स्पष्ट केले. दरम्यान, 21 पैकी 17 जागा बिनविरोध झाल्यानंतर चार जागांवर स्थानिक राजकारणामुळे सहमती न झाल्याने निवडणूक लागली. त्यात नगर, पारनेर व कर्जत या सोसायटी मतदारसंघासह बिगरशेती मतदारसंघाचा समावेश आहे. बिनविरोध निघालेल्या 17 जागांमध्ये 14 जागा या पवार-थोरात गटाच्या असून विखे गटाला दोन जागा मिळाल्या आहेत. विखे गटाकडून आव्हान मिळण्याचा अंदाज होता. मात्र थोरातांनी विखेंना शह दिल्याचे म्हटले जात आहे.

साधारण महिनाभरापूर्वी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार गुरूवारी माघारीचा शेवटचा दिवस होता. काल दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीची मुदत होती. मात्र, माघारीसाठी शेवटच्या तासाभरात मोठी गर्दी झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांनी माघारीसाठी अर्धा तासाचा वेळ वाढवून दिला. माघारीची मुदत सपल्यानंतर 21 पैकी 17 जागा बिनविरोध निघाल्या आहेत. उर्वरित चार जागांमध्ये सोसायटी मतदारसंघातील नगर, पारनेर आणि कर्जत तसेच बिगर शेती मतदारसंघात एकमत न झाल्याने याठिकाणी निवडणूक होणार आहे. दरम्यान, काल सकाळी दहापासून नगर शहरातील लालटाकी येथील जिल्हा परिषद अध्यक्षांचे शासकीय निवासस्थान,

यशवंत कॉलेनीतील आ. आशुतोष काळे यांचे निवासस्थान आणि विळद घाटात राजकीय घडमोडी वेगाने घडत होत्या. महसूल मंत्री थोरात हे आ. काळे यांच्या निवासस्थानी, राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे चंद्रशेखर घुले लालटाकी येथून तर आ. राधाकृष्ण विखे पाटील विळद घाटातून बँकेच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत सुत्रे फिरवित होते. साधारण बाराच्या दरम्यान उमेदवारी माघारीला सुरूवात झाली.

बँकेच्या निवडणुकीसाठी 195 उमेदवारी अर्ज दाखल होते. यातून बुधवारपर्यंत पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर 25 उमेदवारांनी माघार घेतली होती. गुरूवारी माघारीच्या दिवशी तब्बल दीडच्या दरम्यान उमेदवारांनी माघार घेतली असल्याने बँकेच्या 17 जागा बिनविरोध निघाल्या आहेत. मात्र, चार मतदारसंघात निवडणूक होणार असून यात कर्जतमध्ये तिरंगी तर उर्वरित मतदारसंघात दुरंगी लढत होणार आहे.

या आहेत चार लढती

नगर सेवा सोसायटी मतदारसंघात माजी आ.शिवाजीराव कर्डिले व सत्याभामाबाई भगवानराव बेरड, कर्जत सेवा सोसायटी मतदारसंघात अंबादास शंकरराव पिसाळ व मिनाक्षी सुरेश साळुंके तर पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघात उदय गुलाबराव शेळके व रामदास हनमिंत भोसले रिंगणात आहेत. तर बिगर शेती संस्थांच्या मतदारसंघात प्रशांत सबाजीराव गायकवाड व दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांच्यात लढत आहे. यापैकी शेळके, गायकवाड, साळुंके हे उमेदवार पवार-थोरात गटाचे आहेत. तर भाजप नेते कर्डिले यांनी देखिल बँकेच्या राजकारणात थोरात गटासोबत असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.

यशवंत कॉलनीत थोरातांचे वॉर रूम

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी माघारीच्या दिवशी यशवंत कॉलेनीत आ. आशुतोष काळे यांचे निवासस्थान ना.थोरातांसाठी वॉररूम ठरले. मंत्री थोरात या ठिकाणी बसून माघारीचे सुत्रे हलवित होते. आ. काळे हे यावेळी त्यांच्या समवेत होते. ज्या मतदारसंघात अडचणी होत्या. त्या ठिकाणचे शिष्टमंडळ मंत्री थोरातांच्या भेटीला पोहचत होते. या ठिकाणीच मंत्री थोरात यांनी निवडणुकीतील बहुतांशी गणितं सोडविली.

घुले यांचे नेतृत्व फळाला

जिल्हा बँकेसाठी राष्ट्रवादीचे नेते चंद्रशेखर घुले यांच्या खांद्यावर पक्षाने नेतृत्वाचा भार सोपविला होता. घुले लालटाकी या ठिकाणी असणार्या बंगल्यात बसून राष्ट्रवादीचे सुत्रे हलवित होते. त्यांच्या मदतीला जिल्हाध्यक्ष राजेेेंद्र फाळके, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय कोळगे हे होते. यासह ज्ञानेश्वर साखर कारखान्यांचे अध्यक्ष नरेंद्र पाटील घुले हे देखील या ठिकाणी ठाण मांडून होते.

मंत्री थोरात- कर्डिले भेट

दुपारी अडीच्या सुमारास मंत्री थोरात हे यशवंत कॉलेनीतून लालटाकी येथे जाण्यास निघाले. मात्र, त्यांनी लालटाकी ऐवजी शासकीय विश्रामगृह गाठले. या ठिकाणी पोहचल्यानंतर काही वेळात भाजपचे नेते माजी आ. शिवाजीराव कर्डिले पोहचले. यावेळी त्यांच्यात दहा मिनिट चर्चा झाली. त्यानंतर मंत्री थोरात लालटाकी या ठिकाणी पोहचले. कर्डिले विखेंच्या बैठकीतून थोरातांच्या भेटीसाठी पोहचल्याचे सुत्रांनी सांगितले.

कानवडे, जगताप...?

जिल्हा बँकेवर पवार-थोरात गटाने वर्चस्व मिळविल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ना.थोरात यांनी आमचाच अध्यक्ष होणार, हे निक्षूण सांगितले. त्यासोबत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या संभाव्य नावांवर निवडणूक संपलेली नसताना चर्चा सुरू झाली. यावेळी अध्यक्षपद थोरात समर्थकाकडे जाणार, अशी चर्चा आहे. सहकारी साखर कारखाना अत्यंत निष्ठेने, काटेकोरपणे, आर्थिक शिस्त पाळण्याची कौशल्य असलेले माधवराव कानवडे चर्चेत आहेत. त्यांच्या जोडीला राष्ट्रवादीकडून तरूण नेता दिला जाण्याची शक्यता आहे. यासाठी पहिली पसंती श्रीगोंद्याचे माजी आ.राहुल जगताप असतील की अन्य कोणी हे लवकरच स्पष्ट होईल. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी ‘थोरात हे मोठे नेते झाले. त्यांचे बँकेकडे लक्ष नाही’ अशा कानपिचक्या दिल्या होत्या. त्यामुळे जिल्हा बँकेत शिस्तीचा कारभार व्हावा यासाठी ना.थोरात यावेळी कटाक्षाने लक्ष ठेवणार असल्याचे म्हटले जाते.

पिचड पिता-पुत्र बाहेर

जिल्हा बँकेतील राजकारणातून अनेक वर्षांनंतर ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि माजी संचालक वैभव पिचड बाहेर झाले. पिचड यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये उडी घेतल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी बँकेच्या राजकाणारतून पिचड पिता-पुत्रांचा पत्ताच कापला. गणित न जुळल्याने ऐनवेळी वैभव पिचड यांना माघार घेण्याची वेळ आली.

श्रीरामपुरातून प्रथमच दोन संचालक

‘सहमती’च्या राजकारणात श्रीरामपूर तालुक्याच्या वाट्याला जिल्हा बँकेची दोन संचालकपदे आली आहेत. सेवा सोसायटी मतदारसंघातून माजी आ.भानुदास मुरकुटे तर ओबीसी मतदारसंघातून उपनगराध्यक्ष करण ससाणे बिनविरोध झाले. यापूर्वी तालुक्याने जिल्हा बँक निवडणुकीतील ससाणे-मुरकुटे संघर्ष अनुभवला आहे. यावेळी मात्र दोन्ही गटांना जिल्हा बँकेत स्थान मिळाले. यामुळे ससाणे व मुरकुटे एकाचवेळी जल्लोष करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, जिल्हा बँकेत सेवा सोसायटी मतदारसंघासह 17 जागा बिनविरोध झाल्याने काही मतदारांचा मात्र हिरमोड झाला. त्यांना यावेळी ‘व्हीआयपी’ पाहुणचार अनुभवता आला नाही. नेत्यांच्या ‘भेटी-गाठी’ही झाल्या नाहीत.

विखेंची विळद घाटात बैठक

विळद घाटात गुरूवारी सकाळी विखे समर्थकांची बैठक झाली. आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या बैठकीचे सुत्रे होती. खासदार डॉ.सुजय विखे पाटील अखेरच्या टप्प्यातील चाचपणीसाठी प्रयत्नशील होते. अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आ.बबनराव पाचपुते, माजी आ.बाळासाहेब मुरकुटे, सुजित झावरे व कोपरगावचे विवेक कोल्हे या बैठकीला भेट देऊन गेले. मात्र या बैठकीचा परिणाम दिवसभरातील घडामोडींवर दिसला नाही. तीन जागांसाठी ‘सहमती’ची चर्चा सुरू असल्याचे वृत्त होते. मात्र यास ना.थोरात यांनी काही प्रतिसाद दिला किंवा नाही, हे माघारीपर्यंत स्पष्ट झाले नाही.

कोणासाठी कोणी घेतली माघार

अकोले : सीताराम गायकर बिनविरोध निवडून आले असून त्यांच्यासाठी सुरेश गडाख व दशरथ सावंत यांनी अर्ज मागे घेतला. जामखेड : अमोल राळेभात यांच्यासाठी पिता जगन्नाथ राळेभात व सुरेश भोसले यांनी अर्ज मागे घेतले. कोपरगाव ः विवेक कोल्हे यांच्यासाठी पिता बिपीन कोल्हे, देवेंद्र रोहमारे, किसनराव पाडेकर, अलकादेवी जाधव यांनी माघार घेतली. नेवासे ः मंत्री शंकरराव गडाख यांच्यासाठी शिवाजीराव शिंदे, कारभारी जावळे, रत्नमाला लंघे यांनी माघार घेतली. पाथर्डी ः आ. मोनिका राजळे यांच्यासाठी मथुराबाई वाघ यांनी माघार घेतली. राहुरी ः अरुण तनपुरे यांच्यासाठी मंत्री प्राजक्त तनपुरे, सुरेश बनकर, तानाजी धसाळ, सत्यजित कदम, सुभाष पाटील, नामदेव ढोकणे, यांनी माघार घेतली. संगमनेर ः माधवराव कानवडे यांच्यासाठी दिलीप वर्पे, रंगनाथ फापाळे, रमेश मगर, दिनकर गायकवाड यांनी माघार घेतली. श्रीगोंदे ः राहुल जगताप यांच्यासाठी राजेंद्र नागवडे, वैभव पाचपुते व प्रणोती जगताप यांनी माघार घेतली. श्रीरामपूर ः भानुदास मुरकुटे यांच्यासाठी करण ससाणे, दीपक पटारे व कोंडिराम उंडे यांनी माघार घेतली.

शेतीपूरक, शेती मालप्रक्रिया व पणन मतदारसंघ ः आमदार आशुतोष काळे यांच्यासाठी गणपतराव सांगळे, माधवराव कानवडे, वैभव पिचड, दादासाहेब सोनमाळी, सुभाष गुंजाळ, मधुकर नवले, भानुदास मुरकुटे, रोहिदास कर्डिले, रावसाहेब शेळके, तानाजी धसाळ, सुरेश पठारे, राजेंद्र नागवडे, केशव भवर, उत्तमराव चरमळ, संभाजी रोहोकले, अरुणराव येवले, संभाजीराव गावंड, इंद्रनाथ थोरात, रावसाहेब म्हस्के, सुधीर म्हस्के, दत्तात्रय पानसरे, रावसाहेब डुबे, विक्रम देशमुख, रामचंद्र मांडगे, महेश देशमुख, राहुल जगताप, राजेश परजणे यांनी माघार घेतली.

विशेष मागास मतदारसंघ ः गणपतराव सांगळे यांच्यासाठी अभय आव्हाड, त्रिंबक सरोदे, सुभाष गिते, जिबाबा लोंढे, काशाबाई गोल्हार, शाळीग्राम होडकर, एकनाथ धानापुने, गंगाधर तमनर, धनराज कोपनर, अशोक कोळेकर.

महिला प्रतिनिधी मतदारसंघ ः आशा तापकीर व अनुराधा नागवडे यांच्यासाठी संगिता वाघ, मिनाक्षी पठारे, जयश्री औटी, सुप्रिया पाटील, पद्मावती म्हस्के, अर्चना पानसरे, सोनल गायकवाड, चैताली काळे, वत्सला रोहकले, अनिता गाडे, स्वाती बोठे, काशाबाई गोल्हार, मिनाक्षी सांळुके, सीतल म्हस्के, शशिकला पाटील, रत्नबाई ढोकणे, अनिता पानसंबळ, कांचन शिंदे, शैलेजा धुमाळ, शकुंतला चौधरी, प्रियांका देशमुख, सरोजा सोले पाटील, रत्नमाला लंघे, रुपाली लुणिया, लता वाढेंकर, सुनिता कोठारी यांनी माघार घेतली.

इतर मागासवर्ग मतदारसंघ ः करण ससाणे यांच्यासाठी अनिल शिरसाठ, अण्णासाहेब शेलार, दादासाहेब सोनमाळी, काकासाहेब तापकिर, भानुदास मुरकुटे, रोहिदास कर्डिले, सुरेश करपे, रविंद्र बोरवके, पांडूरंंग अंभग, भगवान फुलसौंदर, तान्हाजी धसाळ, कैलास शेवाळे, दिपक पटारे, केशव बेरड, सचिन गुजर, प्रशांत गायकवाड, आशुतोष काळे, केशव भवर, इंद्रनाथ थोरात क्षितिज घुले, नानासाहेब तुवर, शितल म्हस्के, तुकराम दरेकर, दत्तात्रय पानसरे, सतिष कानवडे, महेंद्र गुंड, पांडूरंग सोले पाटील, संदिप मोहरे, विठ्ठलराव लंघे, अर्चना पानसरे, विलास शिरसाठ, सुरेश बानकर यांनी माघार घेतली.

विद्यमान सहा संचालकांना पुन्हा संधी

माघरीच्या प्रक्रिये दरम्यान बँकेच्या विद्यमान सहा संचालकांनी पुन्हा संचालक होण्याचा मान मिळविला आहे. यात विद्यमान चेअरमन सीताराम गायकर, अण्णासाहेब म्हस्के, अरूण तनपुरे, चंद्रशेखर घुले, तर गतवेळचे स्विकृत संचालक आ. मोनिका राजळे आणि करण ससाणे यांचा समावेश आहे. यासह दोन माजी संचालक पुन्हा संचालक झाले आहेत. यात मंत्री शंकरराव गडाख आणि भानुदास मुरकुटे यांचा समावेश आहे.

हे आहेत नवे चेहरे

आ. आशुतोष काळे, विवेक कोल्हे, राहुल जगताप, अनुराधा नागवडे, माधवराव कानवडे, अमित भांगरे, आशा तापकिर, अमोल राळेभात आणि गणपतराव सांगळे यांचा यात समावेश आहे.