
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा सहकारी बँकेने पारंपरिक सोसायट्यांना कर्ज देण्यासोबतच नव्याने स्टार्टअपसाठी कर्ज उपलब्ध करून द्यावेत. देशपातळीवर सहकारात बदल घडत आहेत. त्यामध्ये योगदान द्यावे, सहकारातून रोजगार निर्मितीचे काम करावे, नव्या तंत्रज्ञानाच्या स्टार्टअपला व महिला बचत गटांचे कर्ज वितरण वाढवावे, अशी अपेक्षा महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोबाईल बँकिंग सुविधेची सुरुवात पालकमंत्री विखे यांच्याहस्ते गुरुवारी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले होते. यावेळी खा. डॉ. सुजय विखे, बँकेचे संचालक आ. मोनिका राजळे, संचालक माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, भानुदास मुरकुटे, राहुल जगताप, सिताराम गायकर, अंबादास पिसाळ, अरुण तनपुरे, करण ससाणे, अनुराधा नागवडे, अमोल राळेभात, प्रशांत गायकवाड, आशा तापकीर आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री विखे यांचा वाढदिवसानिमित्त बँकेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
मंत्री विखे म्हणाले, बाजारपेठांमधून बदल होत आहेत, ऑनलाईन व्यवहारात मोठा पैसा आहे, बँकेकडे साडेचार लाख ठेवीदार, खातेदारांचा डाटाबेस तयार आहे, खातेदारांचे कुटुंब असा एकूण आठ ते दहा लाख लोकांचा डाटा आहे, त्याचा उपयोग करून घ्यावा. शेती उत्पादनाची क्षमता घटत चालली आहे, कारण दिलेले कर्ज त्याच कारणासाठी वापरले जात नाही. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानासाठी बँकेने कर्ज उपलब्ध करावे, जिल्ह्यातील शेतीमधील गुंतवणूक वाढावी याचाही विचार करावा, देशात सहकार कायद्यासाठी माजी मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते मुरकुटे यांच्यासारख्या अभ्यासू संचालकांनी या समितीकडे शिफारसी कराव्यात.
2016 पासून कर्ज थकबाकीदारांना कर्जमाफी मिळालेली आहे. मात्र, 2015 च्या आधीच्या थकबाकीदारांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी ओटीएस योजना लागू केली जावी, यासाठी तसेच भरती प्रक्रियेस मान्यता मिळावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे मंत्री विखे यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करून बँकेचे अध्यक्ष कर्डिले म्हणाले, बँकेने पीक, शेती व हार्वेस्टरवरील कर्ज वितरणात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. घरबांधणी कर्जातही वाढ केली जाईल. सोलरसाठी कर्ज वितरण सुरू करण्यात आले.
मात्र त्याचा लाभ होताना दिसत नाही. अनिष्ट तफावतीत सापडलेल्या सेवा संस्थांसाठीही ओटीएस योजना राबवली जाईल, पीक कर्जाची मर्यादा 50 हजारांपर्यंत वाढ करण्यासाठी संचालकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. बँकेचे संचालक मुरकुटे यांचेही भाषण झाले. कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. बँक स्थापनेपासूनच्या घडामोडीवर आधारित चित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली.
सोसायट्यांपेक्षा बचतगटांचा कर्जफेडीचा वेग अधिक
नगरसह राज्यात अतिवृष्टीनंतर देखील राज्य सरकारला कर्जमाफी द्यावी लागत आहे. यामुळे जिल्हा बँकेने दिलेले कर्ज हे शेतकरी किती नवीन तंत्रज्ञानासाठी वापरत आहेत, हे पाहणे गरजेचे आहे. राज्य सरकार केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात शेतीविषयक गुंतवणुकीत वाढ होत आहे. दुसरीकडे कोविडनंतर सर्व काही ऑनलाईन झाले आहे. रात्रीचे (पेय) देखील आता ऑनलाईन उपलब्ध आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात सहकारी सोसायट्यांसोबत महिला बचत गटांच्या स्पर्धा सुरू असून सोसायट्यांच्या तुलनेत बचत गटांचा कर्जफेडीचा परतावा अधिक असल्याचे यावेळी विखे पाटील यांनी नमुद केले.