जिल्हा बँकेच्या शाखाधिकार्‍याने केला 25 लाखांचा अपहार

युजर आयडी व पासवर्डचा गैरवापर || चांदेगाव शाखाधिकारी विरोधात गुन्हा
जिल्हा बँकेच्या शाखाधिकार्‍याने केला 25 लाखांचा अपहार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या राहुरी तालुक्यातील चांदेगाव शाखेतील शाखाधिकारी कम क्लर्कने युजर आयडी व पासवर्डचा गैरवापर करून तीन खातेदारांच्या खात्यातून 24 लाख 55 हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी या शाखेच्या शाखाधिकार्‍याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी तालुक्यातील चांदेगाव येथील अहमदनगर जिल्हा बँकेच्या शाखेचे खातेदार नाना आनंदा भोर यांनी त्यांच्या खात्यात पैशाचा अपहार झाला असल्याची तक्रार मुख्य कार्यालयात केली होती. त्यानुसार अहमदनगर जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयाने चांदेगाव या जिल्हा बँकेच्या शाखेची अंतर्गत तपासणी करण्याचे आदेश जिल्हा बँकेचे तपासणीस रवींद्र कारभारी बिडवे (रा. चौधरी वस्ती, वॉर्ड नं. 7) यांना दिले.

त्यानुसार अंतर्गत तपासणीस रवींद्र बिडवे व मदतनीस संजय वसंत लावर या दोघांनी चांदेगाव जिल्हा बँक शाखेची अंतर्गत तपासणी केली असता त्यामध्ये 1 जानेवारी 2019 ते 8 जानेवारी 2021 या कालावधीत या शाखेतील खातेदार नाना आनंदा भोर यांच्या बचत खात्यातून 23 लाख रुपये व अशोक सखाहरी खर्डे यांच्या वैयक्तीक बँक खात्यातून 80 हजार रुपये तसेच श्रीमती जिरीजाबाई अशोक खर्डे यांच्या वैयक्तीक खात्यातून 75 हजार रुपये असे एकूण तीन खातेदारांच्या खात्यातून 24 लाख 55 हजार रुपयाचा अपहार तत्कालीन शाखाधिकारी कॅशियर कम क्लर्क राजेंद्र मधुकर लचके(रा. संगमनेररोड, प्राथमिक बँकेशेजारी, श्रीरामपूर) याने बँकेच्या विड्रॉल स्लीपचा, शाखेतील इतर कर्मचार्‍यांचा व स्वतःचा युजर आयडी तसेच पासवर्डचा गैरवापर करून या तीन खातेदारांच्या खात्यातून रकमेचा अपहार केला असल्याचे तपासणीत आढळून आले. चौकशी दरम्यान शाखाधिकारी राजेंद्र मधुकर लचके यांनी लेखी जबाबात या रकमेचा अपहार आपणच केला असल्याची कबुली दिली.

याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात जिल्हा बँकेचे तपासणीस रवींद्र कारभारी बिडवे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 1108/2022 प्रमाणे अहमदगर जिल्हा बँकेचे चांदेगाव शाखेचे शाखाधिकारी क्लर्क कम कॅशियर राजेंद्र मधुकर लचके यांचेविरुध्द भादंवि कलम 406, 409, 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com