एकरक्कमी परतफेड योजनेचा 300 सोसायट्यांना फायदा

जिल्हा बँकेची 66 वी सर्वसाधारण सभा
एकरक्कमी परतफेड योजनेचा 300 सोसायट्यांना फायदा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील 2015 पूर्वीच्या थकबाकीदार सोसायटी आणि सभासद यांच्यासाठी एकरकमी कर्जफेड योजनेला मंजूरी मिळालेली आहे. उद्यापासून या योजनेच्या अंमलबजावणीवर सुरूवात होणार आहे. जिल्ह्यातील थकबाकीदार असणार्‍या 400 सोसायट्यांपैकी 300 सोसायट्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी केले. तसेच बँकेला 52 कोटी रुपयांचा नफा झाला असून सभासद सोसायट्यांना 10 टक्क्यांप्रमाणे लाभांश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा बँकेची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात झाली. सुरवातीला बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे यांनी विषयाचे वाचन केले. सर्व विषय मंजूर झाल्यानंतर संचालक सिताराम गायकर यांनी ऐनवेळचे विषय मांडले. त्यात संचालकांच्या परदेश दौर्‍याचा विषय त्यांनी मांडला. त्याला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर सभासदांना बोलण्याची संधी देण्यात आली. कैलास गोरडे यांनी सहकारी सोसायट्या या जिल्हा बँकेचा आत्मा आहे. त्या बळकट करण्यासाठी बँकेने प्रयत्न केले पाहिजेत. आज 25 टक्के सोसायट्या तोट्यात आहेत. त्यापैकी काही अवसायानात आल्याच्या नोटीसा देखील बजावण्यात आल्या आहेत. या सोसायट्यांना सांभाळण्याची जबाबदारी बँकेची असून त्यांची कर्जाच्या खाईतून सुटका करण्यासाठी बँकेने पुढाकार घेतला पाहिजे.

त्यादृष्टीने बँक काहीच प्रयत्न करत नाही. अध्यक्षासह संचालकांनी समिती नियुक्त करून यावर उपाययोजन कराव्यात. त्यानंतर भाऊसाहेब कचरे यांनी जिल्हा बँका वाचविण्यासाठी आता संचालकांनी प्रयत्न करावेत. नाबार्ड थेट सोसायट्यांना कर्ज पुरवठा करणार असेल तर जिल्हा बँकेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. रणजित बनकर यांनी मध्यम मुदतीचे कर्ज हे सोलर योजनेसाठी देण्यात यावे. त्याला 12 टक्के व्याज न घेता ते 6 ते 7 टक्के व्याजदराने देण्यात यावे, अशी मागणी केली. प्रशांत दरेकर यांनी जिल्हा बँकेच्या शैक्षणिक कर्जाची मर्यादा 5 ते 10 लाखांवरून 15 ते 20 लाख करण्याची मागणी केली. यावेळी पंडित गायकवाड, माधवराव दातीर, लहू थोरात, माऊली हिवरे, अशोक कदम, रामदास झेंडे, भाऊसाहेब ओहळ, अनिल आंधळे, पोपट वाडे, मारूती लांडे, अण्णासाहेब बाचकर, मुक्ताजी फटांगरे, दिनकर गर्जे, भिमराज हारदे या सभासदांनी सुचना केल्या.

यावेळी पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याने 191 कोटी रुपयांचा तोट्याची लपवणूक केल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरूण कडू यांनी केला. यावेळी एका उपस्थित सभासदांनी ही सभा कारखान्यांची नव्हे, तर बँकेची असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर अध्यक्ष कर्डिले यांनी सभासद नात्याने कडू यांना बोलू द्या. अध्यक्ष, संचालक त्यावर उत्तर देतील असे सांगत संबधिताला शांत केले.

सभेला उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संचालक आ. आशुतोष काळे, अण्णासाहेब म्हस्के, चंद्रशेखर घुले पाटील, राहुल जगताप, भानुदास मुरकुटे, सीतराम गायकर पाटील, अमोल राळेभात, अंबादास पिसाळ, गितांजली शेळके, प्रशांत गायकवाड, करण ससाणे, अनुराधा नागवडे, आशा तापकिर, मधुकर नवले, सुरेश सांळुके आदी उपस्थित होते.

बँकेच्या उधळपट्टीवरून गदारोळ

संचालकांनी अभ्यासासाठी परदेश दौरे करावेत, पण परत आल्यानंतर काय अभ्यास केला हे सभासदांना सांगितले पाहिजे. यंदाच्या परदेश दौर्‍यात संचालकांनी प्रत्येक तालुक्यातून काही सभासदांना देखील न्यावे, तसेच 50 लाख अन् एक कोटीच्या गाड्यांची खरेदी करतांना सभासदांचा विचार करावा. एवढी उधळपट्टी न करता काटकसरीने बँकेचे कामकाज करावे अन्यथा मराठवाड्यातील बँकांसारखी स्थिती होईल, याची काळजी जिल्हा बँकेच्या संचालकांनी द्यावे, असे सभासद ए. आर. गोपाळघरे बजावले. तो बोलत असताना काहींनी त्यांचा माईक खेचून त्यांना बाजूला केले व दुसर्‍या सभासदाने लगेच सुचना मांडण्यास सुरूवात केली. यावरून सभेत काही काळ गोंधळ निर्माण झाला. यावेळी व्यासपीठाखाली बसलेल्या सभासदांनी गोपाळघरे यांना बोलू द्या, या मागणीसाठी मोठ्या संख्येने उभे राहत घोषणाबाजी केली. बँकेचे अध्यक्ष कर्डिले यांनी सभासदांना शांत करून प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली जाईल, गोंधळ करू नका असे सांगितले. त्यानंतर सभा शांततेत सुरू झाली. सभेच्या शेवटी संचालक मंडळावर थेट निशाण साधणारे गोपळघरे हे बँकेचे माजी कर्मचारी आहेत. त्यांनी अफरातफर केल्याने त्यांना काढून टाकण्यात आलेले आहे. मात्र, ते एका सोसायटीचे चेअरमन आहेत, यामुळे त्यांना बोलण्याची संधी दिली. त्यांना सेवेतून कमी केल्यामुळे ते संचालक मंडळावर आरोप करत असल्याचा खुलासा अध्यक्ष कर्डिले यांनी केला.

शाखा विस्ताराची मागणी

यावेळी बहुतांशी सभासदांनी बँकेच्या शाखांचा विस्ताराची मागणी करून तसा ठरावा करण्याची मागणी केली. तसेच जिल्हा बँकेने सचिवांची भरती करून सोसायट्यावरील कामाचा ताण कमी करावा, अशी मागणी केली. तर उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी पाच ते सहा सोसायट्यांनी एकत्र येत आधुनिक पध्दतीने शेतीविषय योजना राबवत नाबार्डच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

दुष्काळाचा ठराव

ज्येष्ठ संचालक भानुदास मुरकुटे यांनी सभेत जिल्ह्यात लांबलेला पाऊस यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, पिक विमा कंपनीने तातडीने पंचनामे करत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, तातडीने सचिवांची भरती करावी, असे ठराव सभेत मांडले. यावेळी संचालकांपैकी एकट्या मुरकुटे यांना बोलवण्याची संधी मिळाली. ते भारत राष्ट्र समिती या पक्षात गेल्याने त्यांना संधी दिली असे समजू नका, अशी कोपरखळी अध्यक्ष कर्डिले यांनी मारताच एकच खसखस पिकली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com