तब्बल 52 वर्षांनी होणार जिल्हा बँकेचे फायर ऑडिट

आगीच्या कारणांचा शोध सुरूच
जिल्हा सहकारी बँक
जिल्हा सहकारी बँक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्हा सहकारी बँकेच्या नगरमधील मुख्यालय इमारतीचे तब्बल 52 वर्षांनी फायर ऑडिट होणार आहे. अर्थात, दोनदिवसांपूर्वी बँकेच्या तिसर्‍या मजल्यावरील लेखापरीक्षण विभागाला लागलेल्या आगीमुळे बँकेच्या सत्ताधार्‍यांनी तातडीने फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जिल्हा बँकेत लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे दिसत असले तरी तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने आग लागण्याचे नेमके कारण शोधले जात आहे.

शुक्रवारी (दि.1) सायंकाळी सात वाजता बँक इमारतीतील तिसर्‍या मजल्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशेजारी असलेल्या जिल्हा बँकेच्या ऑडिट विभागाला अचानक आग लागून त्यात आतील फर्निचर, कपाटे, कागदपत्रे, फाईल्स, संगणक जळून खाक झाले आहेत. मनपा व एमआयडीसीच्याअग्निशामक पथकांनी तासभर पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली असली तरीआता या आगीचे नेमके कारण सर्वांच्या उत्सुकतेचे झाले आहे.

बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके व उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी शनिवारी सकाळी नगर जिल्हा सहकारी बँकेतील लेखा परीक्षण विभागाला भेटदिली. यावेळी अ‍ॅड. शेळके म्हणाले, ही इमारत 1970 च्या दशकात बांधलेली आहे. बँकेचे उपाध्यक्ष व आम्ही निर्णय घेतला आहे की या इमारतीचे फायर ऑडिट करून घ्यायचे आहे. त्यात काही दोष असतील तर ते आम्ही सुधारून घेऊ.

या पुढे अशी कोणतीही घटना घडणार नाही याची दक्षता घेऊ, असे सांगूनते म्हणाले, लेखा परीक्षण विभागाला लागलेल्या आगीत दोन-तीन संगणक, काही कागदपत्रे व फर्निचरचे नुकसान झाले आहे. सुदैवाने अग्निशमन विभागाच्या प्रयत्नाने ही आग वेळेतच आटोक्यात आली. लेखा परीक्षण विभागाची जी काही कागदपत्रे जळाली असतील, त्याच्या प्रती इतर ठिकाणीही साठवून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे बँकेच्या कामकाजात काहीअडचणी येणार नाही. शिवाय त्या कागदपत्रांच्या इतर कॉपीही इतर शाखांत असतात. त्यामुळे अडचणी येणार नाहीत, असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

कर्डिलेंच्या धावपळीकडे दुर्लक्ष

जिल्हा सहकारी बँकेला आग लागताच घटनास्थळी सर्व संचालकांच्या आधी भाजपचे ज्येष्ठ नेते व बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजी कर्डिले पोचले होते. त्यांनी बँकेतील आग विझविण्यासाठी त्यांचे जावई व नगर शहराचे राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या मदतीने एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाला पाचारण करीत आगीवर नियंत्रण मिळविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आगीच्या या घटनेची चौकशी करणार असल्याचेही स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर, अध्यक्ष अ‍ॅड. शेळके यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर आगीबाबत माहिती देताना कर्डिले यांचा उल्लेख केला नाही. त्यामुळे आग विझवण्यासाठी कर्डिले यांनी केलेल्या धावपळीकडे अध्यक्ष-उपाध्यक्षांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्ज मर्यादा वाढीवरून सध्या बँकेत सुरूअसलेल्या शेळके-कानवडे विरोधात कर्डिले, अशा शीत युद्धात आगविझवण्यासाठी प्रयत्न केल्याचे श्रेयही कर्डिलेंना जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने सत्ताधार्‍यांनी त्यांचा नामोल्लेख टाळल्याचे बोलले जात आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com