अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्याचे लक्ष लागून असणार्या नगरच्या जिल्हा सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम 19 जानेवारीला जाहीर होण्याची शक्यता आहे.

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी पुढील पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मयत आणि नवीन संस्था सभासदांचे ठराव कार्यक्रमासाठी 18 जानरेवारीपर्यंत मुदत दिलेली आहे. यामुळे त्यानंतर लगेच 19 तारखेला बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता सहकारी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी 7 जानेवारीला प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेचा पुढील भाग म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

आता महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम 2014 मधील नियम 10 (4) मधील तरतुदीनूसार ज्या संस्थेने तिच्या प्रतिनिधीचे नाव कळविलेले असेल, त्या संस्थेला, केवळ प्रतिनिधीचा मृत्यू झाला असले किंवा जेथे नामनिर्र्देशन करण्याच्या शेवटच्या दिनांकापूर्वी पाच दिवसांच्या आत सभासद संस्थेची समिती नव्याने निवडून आली असले त्याबाबतीत, ठरावाव्दारे पाठविलेल्या प्रतिनिधीचे नाव बदलण्याची परवानगी राहणार आहे.

यासाठी 18 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली असून त्यानंतर लगेच 19 तारखेला बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.