आ. संग्राम जगताप एडीसीसीसाठी इंटरेस्टेड

उमेदवारी अर्जाचा अचानक धक्का । अरुणकाकांचाही अर्ज
आ. संग्राम जगताप एडीसीसीसाठी इंटरेस्टेड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्याच्या राजकारणात इंटरेस्ट नसलेले नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनीही जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्यांचे पिताश्री आ. अरूणकाका जगताप यांचाही अर्ज आज दाखल झाला. काल रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी खलबते झाल्यानंतर आ. संग्राम जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

जिल्हा बँक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज सोमवारी शेवटचा दिवस होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे काल रविवारीच नगर जिल्हा दौर्‍यावर आले होते. आ. जगताप यांच्या घरी पवार यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी संवाद साधला. 28 तारखेला जिल्ह्यातील नेत्यांना बैठकीसाठी मुंबईत येण्याचे सांगितले असून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत बँकेच्या निवडणुकीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

पवार यांच्या दौर्‍यानंतर दुसर्‍याच दिवशी आज आ. संग्राम जगताप यांनीही जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे शहरासह जिल्ह्याच्या राजकारणात आ. संग्राम जगताप यांची एन्ट्री होत असल्याचे संकेत मिळत आहे.

बिगर शेती मतदारसंघातून आ. संग्राम जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. या मतदारसंघात 1 हजार 300 मतदार आहेत. पतसंस्था, गृहनिर्माण संस्था आणि मजूर संस्था या मतदारसंघाचे मतदार आहेत. नगर शहर आणि तालुक्यात 222 मतदार असून सर्वाधिक मतदार हे संगमनेरमध्ये 230 इतके असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उमेदवार कोण... पिता की पुत्र?

आ. अरूणकाका जगताप हे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आहेत. बिगर शेती मतदासंघातून ते गतवेळी निवडून आले होते. आताही त्यांनी याच मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आ. अरुणकाका आणि संग्राम या दोघांचेही उमेदवारी अर्ज एकाच मतदारसंघातून आल्याने जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा मान आ. अरुणकाकांना की संग्रामभैय्यांना याची उत्सुकता नगरकरांना लागून आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com