अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल 195 अर्जांपैकी माघारीसाठी आजपासून दहा दिवसांचा कालावधी शिल्लक राहणार आहे. मोठ्या संंख्येने उमेदवारी अर्ज दाखल असल्याने माघारीसाठी नेते मंडळींची धावपळ सुरू आहे.

दरम्यान, उमेदवारी माघारीसाठी स्वत: उमेदवार अथवा त्यांने विहीत नमुन्यांत प्राधिकृत केलेल्या सूचक यांनाच ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीसाठी 11 फेबु्रवारी ही अंतिम मुदत आहे. बँकेच्या 21 पैकी 2 संचालकांच्या जागा या आधीच बिनविरोध झालेल्या आहेत. यामुळे 19 जागांसाठी 193 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

बँकेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत राष्ट्रवादीची स्वतंत्रपणे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एकत्रीत बैठक झालेली आहे, तर संगमनेराला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे वगळता अन्य उमेदवार आणि इच्छुकांची मते जाणून घेतलेली आहेत. त्यानुसार जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, प्रत्यक्षात नेत्यांकडून निवडणुकीबाबत तळ्या-मळ्यात असल्याचे चित्र दाखविण्यात येत आहे. चालू आठवड्यात बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. बँकेच्या सोसायटी मतदारसंघातील 14 जागांचा विषय जवळपास संपुष्टात आलेला आहे. विषय आहे तो उर्वरित सात जागांचा, त्याठिकाणी इच्छुकांनी गर्दी केल्याने त्या जागेवर कोणाला संधी यावरून गोंधळ आहे. या सात मतदारसंघातील कोणाच्या वाट्याला किती जागा येवून शकतात, याबाबत ठोकताळे बांधण्यात येत असले, प्रत्यक्षात कोणत्या मतदारसंघातून कोणाला संधी मिळणार यासाठी काही काळ थांबावे लागणार आहे.

दरम्यान, गतवर्षीचा अनुभव पाहता निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांनी माघारीच्या प्रक्रियेसाठी पारदर्शक आणि सक्त भूमिका घेतली असून अनुमोदक, निवडणूक प्रतिनिधी हे माघारीच्या प्रक्रियेपासून लांब ठेवण्यात आलेले आहेत. माघारीसाठी स्वत: उमेदवार त्यांना शक्य नसल्यास त्यांनी विहीत नमुन्यांत प्राधिकृत केलेला सुचक यांनाच माघारीच्या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात येणार आहे.

शेतीपूरक, बिगर शेती अन् ओबीसीत गर्दी

जिल्हा बँकेच्या शेतीपूरक मतदारसंघातील एका जागेसाठी 28, बिगरशेती मतदारसंघात 29 आणि ओबीसी मतदारसंघात 33 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. या ठिकाणी तिनही मतदारसंघातून प्रत्येकी एकच संचालक निवडून जाणार आहे. यामुळे या मतदारसंघात चांगलीच गर्दी झाली असून इच्छुकांची समजूत घालताना नेत्यांची दमछाक होणार आहे.