अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी 195 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातील दोेघे संचालक जवळपास बिनविरोध निवडून आलेले आहेत.

उर्वरित 19 जागांसाठी निवडणूक होणार की बिनविरोध यासाठी पुढील आठवड्यातील घडामोडी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. दरम्यान, माघारीसाठी 11 फेबु्रवारी अंतिम मुदत असून सोमवारपासून माघारीसाठी नेत्यांची धावपळ सुरू होणार आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी 20 फेबु्रवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक तालुक्यातील नेत्याच्या ताकदीनुसार 14 सोसायटी मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघांमध्ये फारसा बदल किंवा उलटफेर होणार नसल्याचे आतापर्यंत तरी दिसते आहे.

प्रश्न आहे तो उर्वरित सात मतदारसंघाचा. यात शेती पूरक, बिगर शेती, दोन महिला राखीव, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी आणि भटक्या विमुक्त जमाती मतदारसंघाचा समावेश आहे. तालुक्यातून मिळणार्या मताधिक्यांवर या मतदारसंघातील उमेदवारांचा विजय निश्चित होणार आहे.

दुसरीकडे निवडणुकीसाठी मोठ्या संख्याने उमेदवारी अर्ज दाखल असल्याने उमेदवारी माघारीसाठी नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. उद्यापासून माघारीसाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांची धावपळ उडणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अनेक इच्छुकांनी आपले मोबाईल बंद केले असल्याने त्यांना शोधताना नेत्यांचा कस लागत आहे. येणारा आठवडा हा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी निर्णायक ठरणार आहे. यात घडणार्या राजकीय घडामोडी, बैठका यामुळे बँकेच्या निवडणुकीला कलाटणी बसण्याची शक्यता आहे.

जागा वाटपाची अशी शक्यता

सोसायटी मतदारसंघ वगळून उर्वरित सात जागांमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला 4, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात गटाला 2 आणि शिवसेनेला 1 जागा मिळण्याची शक्यता बँकेच्या वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे. यासह सोसायटी मतदारसंघात संगमनेर, श्रीरामपूर काँग्रेस, राहुरी, शेवगाव, पारनेर आणि श्रीगोंदा राष्ट्रवादी, नेवासा शिवसेना, अकोले, कोपरगाव, नगर आणि पाथर्डी भाजप आणि जामखेड आणि राहाता हे तालुके विखें समर्थकांच्या वाट्याला मिळण्याची शक्यता आहे. कर्जत सोसायटी मतदारसंघाबाबत संभ्रम असून या ठिकाणी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.