जिल्हा बँक पीक कर्जाची मर्यादा एकरी 30 हजारांवर

कर्जमर्यादा 10 हजारांनी वाढवली : शेतकर्‍यांना लाभ
जिल्हा सहकारी बँक
जिल्हा सहकारी बँक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या पीक कर्जाची मर्यादा एकरी 20 हजार ऐवजी 30 हजार करण्यात आली आहे. मंगळवारी जिल्हा बँक संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी पीक कर्जाची मर्यादा वाढविण्याची मागणी केली होती. या मागणीला संचालक मंडळाने एकमुखी पाठिंबा दिला. बँकेचे चेअरमन उदय शेळके व व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली.

करोना काळात अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना मदत व्हावी तसेच त्यांची सावकारी जाचातून मुक्तता व्हावी, यासाठी माजी मंत्री कर्डिले यांनी पीक कर्जाची मर्यादा एकरी 20 हजार ऐवजी 30 हजार करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार पीक कर्जाची मर्यादा वाढविण्यात आली आहे. आता मार्चअखेर ज्या सभासदांनी आपले पीककर्ज पूर्ण भरले, असेल अशा सभासदांना 15 एप्रिलपर्यंत ही कर्जसुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच करोनाकाळात संजीवनी ठरलेल्या खेळते भांडवल योजनेचे कर्जही नियमित भरणार्‍यांना परत मिळणार आहे.

ही दोन्ही कर्जे अल्पव्याजदराने मिळणार असल्याने ऐन अडचणीच्या काळात शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी मार्च अखेर नियमीत कर्जफेड करून एप्रिलमध्ये वाढीव कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजीमंत्री कर्डिले यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com