जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टरवर पेरण्या

पाऊस गायब : शेतकर्‍यांनी घाईन करण्याचा कृषी विभागाचा सल्ला
जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टरवर पेरण्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जून महिन्यांचा शेवटचा आठवड्या सुरू झाला आहे. मृग नक्षत्र जिल्ह्यात जवळपास कोरडे गेलेले आहे. यामुळे अनेक भागात खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या असून ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत. त्याठिकाणी पावसाने खंड दिल्याने पिके अडचणीत आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात 1 लाख 24 हजार 357 हेक्टवर पेरण्या झाल्या असून 100 मिली मीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याशिवाय शेतकर्‍यांनी पेरण्या करू नये, असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात येत आहे.

नगर जिल्ह्यात खरीप हंगामाचे 4 लाख 47 हजार 904 हेक्टर हे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र आहे. वेळेवर आणि मुबलक पाऊस झाल्यास हे क्षेत्र साडेपाच लाखांपर्यंत वाढत असते. यंदा देखील सुरूवातीला पावसाने चांगली सुरूवात केली. विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीला सुरूवात केली. मात्र, 7 जूनला सुर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश झाला आणि जिल्ह्यातील बहूतांशी भागातील पाऊस गायब झाला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी कडधान्य पिकांची पेरणी करून ठेवली असून या पिकांना पावसाअभावी फटका बसणार आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 24 हजार 357 हेक्टवर खरीप हंगामाठी पेरण्या झालेल्या आहेत. पेरण्याची टक्केवारी ही 27.76 टक्के आहे. यात अकोले तालुक्यात भात पिकाची 1 हजार 609 हेक्टर (11.46) टक्के, बाजरी 17 हजार 579 हेक्टर (12.48) टक्के, मका 6 हजार 274 हेक्टर (19.26) टक्के, तूर 10 हजार 625 हेक्टर (70.27) टक्के, मूग 21 हजार 493 हेक्टर (53) टक्के, उडिद 40 हजार 997 हेक्टर (232. 99) टक्के, कापूस 12 हजार 253 हेक्टर (10.42) टक्के. यासह नव्याने 3 हजार 463 हेक्टवर ऊसाची लागवड झालेली आहे.

दरम्यान, गेल्या 10 ते 12 दिवसांपासून उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत आला असून पावसाचा खंड कितीचा दिवसांचा राहणार यावर हंगामातील पेरण्या अवलंबून राहणार आहेत. तर कृषी विभागाने शेतकर्‍यांनी घाई करू नये, पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यावर पेरण्या कराव्यात, दुबार पेरणीसाठी बियाणांची अडचण येण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

शेतकर्‍यांसाठी सल्ला

शेतकर्‍यांनी बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी बिज प्रक्रिया करावी, पेरण्या करतांना रुंद सरी काढून पेरणी करावी, शंभर मिली मीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com