जिल्हा प्रशासनाला मिशन वात्सल्य समितीच्या बैठकांचा विसर

जिल्हा प्रशासनाला मिशन वात्सल्य समितीच्या बैठकांचा विसर

करोना एकल महिलांना न्याय मिळेना - साळवे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोना एकल महिला व बालकांना आधार ठरू शकणार्‍या तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समित्यांच्या बैठकांचा जिल्हाधिकार्‍यांसह समितीचे अध्यक्ष असलेले तहसीलदार व सदस्य सचिव असलेले बालविकास प्रकल्पाधिकारी यांना विसर पडला आहे.

या महिलांच्या अडचणी, समस्यांना वाचा फोडून पुनवर्सनासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र करोना एकल महिला पुनर्वसन समिती अहमदनगर जिल्ह्यात स्थापन झाली. राज्यभरात तिचा विस्तार होऊन सरकारदरबारी मंत्री, लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा केल्यानंतर मिशन वात्सल्य अभियानचा जन्म झाला. महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी 27 ऑगस्ट 2021 रोजी राज्यभरात तालुका स्तरावर मिशन वात्सल्य समित्या गठीत करण्याचा शासन निर्णय जारी केला. त्यानुसार तहसीलदारांना समितीचे अध्यक्ष व पंचायत समितीच्या महिला व बालविकास प्रकल्पाधिकार्‍यांना सदस्य सचिव करण्यात आले.

समितीच्या दर आठवड्यात बैठका घेण्याचे आदेश आहेत. पण अहमदनगर जिल्ह्यासह राज्यभरात या समित्यांच्या बैठका आठवडाभरात तर नाहीच, पण महिनाभरातही होत नसल्याची व्यथा करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे श्रीरामपूर तालुका समन्वयक व मिशन वात्सल्य समितीचे अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे मांडली आहे.

तालुकास्तरीय समितीने केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा कृती दलाच्या बैठकीत घेण्याचे आदेश आहेत. पण तहसीलदार, बालविकास प्रकल्पाधिकारी यांच्याप्रमाणेच जिल्हाधिकारी देखील नियमित बैठका न घेता स्वतःच शासन निर्णय पायदळी तुडवित असल्याचा आरोप करून जिल्हा कृती दल व मिशन वात्सल्य समित्यांच्या बैठका घेण्याबाबत शासन निर्णयाचे पालन न करणार्‍या अधिकार्‍यांवर सरकारने कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्री. साळवे यांनी केली आहे.

करोनाविषयक अहमदनगर जिल्हा कृती दल व तालुकास्ततरीय मिशन वात्सल्य समिती बैठकांच्या विषयपत्रिका, इतिवृत्त यांची साळवे यांनी कृती दलाचे सदस्य सचिव असलेले जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. बी. वारूडकर यांच्याकडे माहिती अधिकारात मागणी केली होती. पण दोन महिन्यानंतरही राहुरीचा अपवाद सोडल्यास जिल्हा दलासह एकाही समितीचे इतिवृत्त मिळालेले नाही, असे श्री. साळवे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com