सार्वमत

जिल्ह्यात श्रावणी सरींची जोरदार सलामी

सोयाबीन, कापूस धोक्यात, उसाला फायदा

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

नगर शहरासह श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, राहाता, संगमनेर, नेवाशासह जिल्ह्यात सर्वदूर श्रावणी सरींनी जोरदार सलामी दिली. अनेक ठिकाणी दोन-तीन तास मुसळधार पाऊस झाल्याने सोयाबीन,कापूस पिक धोक्यात आले आहे तर ऊसाला फायदा होणार आहे.

श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, राहाता, संगमनेर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतात पाणीच पाणी झाल्याने सोयाबीन आणि कापसासह अन्य खरीपाची पिके धोक्यात आली आहेत. तर ऊसाला या पावसाचा फायदा होणार आहे. दरम्यान काही ठिकाणी गत तीन चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

श्रीरामपूर व परिसरात रात्री 11 वाजेपर्यंत रिपरिप सुरू होती कोपरगावातील सोनेवाडी, कोपळपेवाडी व अन्य भागात मुसळधार पाऊस झाला. राहुरी शहरासह टाकळीमिया, वांबोरी, पिंपळाचा मळा, भागडा डोंगर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. नगरशहर व तालुक्यातही जोरदार हजेरी लावली.

भंडारदरा 45 टक्के भरले

भंडारदरा, कोतूळ|वार्ताहर|Bhandardara, Kotul

11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात काल गुरूवारी सायंकाळी पाणीसाठा 4970 दलघफू (45.2टक्के) झाला होता. काल गुरूवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अर्धातास जोरदार पाऊस झाला.त्यानंतर अधूनमधून सरी कोसळत होत्या. दरम्यान मुळा पाणलोटात रात्री पाऊस सुरू झाल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गत पाच-सहा दिवसांपासून या भागात पावसाने उघडीप घेतली होती.

Deshdoot
www.deshdoot.com