खाण कामगारांच्या मुलांना मिळाली मायेची ऊब

शैक्षणिक तसेच गरजेच्या वस्तूंचे वाटप
खाण कामगारांच्या मुलांना मिळाली मायेची ऊब

अकोले (प्रतिनिधी)

तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथे महालक्ष्मी मंदिर परिसरातील खाण कामगारांच्या मुलांना मायेची ऊब मिळाली आहे. प्राथमिक शिक्षक व दानशूर यांच्यावतीने शैक्षणिक तसेच गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

पिंपळगाव नाकविंदा येथे काही दिवसांपासून खाण कामगारांची अनेक कुटुंबे पाले ठोकून राहत आहेत. या कुटुंबातील अनेक मुले उन्हातान्हात, पावसा पाण्यात आई वडिलांच्या मागे मागे फिरत होती. अनेकांच्या अंगावर पुरेशी कपडेही नव्हती. पोटासाठी दाहीदिशा फिरणाऱ्या या कुटुंबातील मुले प्रथम पंचायत समिती अकोलेच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सविता कचरे यांच्या नजरेस पडली. या मुलांसाठी आपण काहीतरी करायचे असे ठरवून त्यांनी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना भावनिक आवाहन केले.

राजूर बिटातील उपक्रमशील विद्या घिगे, डिंपल बांगर, शकुंतला उगले, भाऊराव सुपे, काळू तपासे, दिपक बो-हाडे, बाळू डगळे यांना स्वयंप्रेरणेने या मुलांना आहे त्याच ठिकाणी मंदिर परिसरात अध्यापनाचे धडे देण्यास सांगितले. शिक्षकांनीही आपल्या कौशल्याचा वापर करून या मुलांमध्ये कमी कालावधीत शिक्षणाची गोडी निर्माण केली. तसेच या कामी तालुक्यातील अनेक प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला.

सर्वप्रथम निळवंडे शाळेचे काळू तपासे, रेखा लावरे, सावरगाव पाट शाळेचे सचिन गवांदे यांनी नियोजन करून नेतृत्व केले. तालुक्यातील अनेक देणगीदारांनी या आवाहनास भरपूर प्रतिसाद दिला. त्यामध्ये प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, डॉक्टर्स, व्यावसायिक, दुकानदार सेवानिवृत्त शिक्षक यांनीही भरघोस अशी मदत केली. स्वामी समर्थ क्लॉथ सेंटर, वैशाली जनरल स्टोअर्स, वैशाली ब्याग्स हाउस, डॉ. बंगाळ बालरुग्णालय, धनंजय सुपर शॉपी, सौभाग्य कलेक्शन, वसंत आहेर, विलास सावंत, सुरेखा नेहे या अकोले शहरातील दानशूर देणगीदारांनी सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून या कामी मदत केली.

एका छोटेखानी कार्यक्रमात या मुलांना शाळेचे गणवेश, रंगीत कपडे, ऊबदार स्वेटर्स, शालेय साहित्य, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, चप्पल, बुट, स्वच्छतेच्या किट्स असे एकूण पन्नास ते साठ हजार रुपये किमतीचे साहित्य वाटप केले. याप्रसंगी या मुलांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेची भावना ओसंडून वाहत होती. या कार्यक्रमास अकोले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. तसेच संबधित मुले शेजारच्या शाळेत दाखल करून घेतले त्याबद्दल सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले.

विस्ताराधिकारी गायकवाड, रवीं रुपवते, सुभाष बगणर, सुनिता जगताप, सुनील धुमाळ, दिपक बोहऱ्हाडे, मारुती आभाळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन काळू तपासे तर सुभाष बगणर यांनी आभार मानले. रुपाली रासने व सचिन गवांदे यांनी मुलांना खाऊचे वाटप केले.

Related Stories

No stories found.