इमारतीचे निर्लेखन झाल्याने पाचेगाव प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची गैरसोय
पाचेगाव |वार्ताहर| Pachegav
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे काही दिवसांपूर्वी शासनाच्या नियमानुसार निर्लेखन करण्यात आले. जवळपास पन्नास वर्षांपूर्वीची शाळा इमारत जमीनदोस्त करण्यात आली. मात्र नवीन इमारत उभी करण्यात न आल्याने गावातील तीन ठिकाणी विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे मात्र शाळेतील पटावर देखील मोठा परिणाम दिसून आला आहे. या शाळेत जवळपास पहिली ते चौथी मध्ये 283 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मुलांची गैरसोय होत असल्याने 17 मुले ही शाळा सोडून दुसर्या शाळेत गेली.
विविध तीन ठिकाणी मुलांची पर्याय व्यवस्था करण्यात आली. पण त्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी जागा, पाण्याची व्यवस्था, मुलांना शौचालयासाठीही जागा नाही.अशा अडचणींचा समाना करत विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत आहे. पोषण आहार घेण्यासाठी देखील मुलांना शाळेच्या मुख्य ठिकाणी येऊनच घ्यावा लागतो.
पन्नास वर्षांपूर्वीची आठ खोल्याची शाळा सप्टेंबर महिन्यात जमीनदोस्त करण्यात आली. तसे पाहिले तर ही शाळा भक्कम पायाभरणीत मजबूत होती. मात्र निर्लेखनमध्ये शाळा शासनाच्या नियमानुसार पडण्यात आली.
आता नवीन इमारत या शाळेला मिळणार असून जवळपास 5 एकर जागेवर (1 हेक्टर 96 आर) ही शाळा उभी राहणार आहे.
चौथी वर्गाची अवस्था फार बिकट आहे.गावातील वाढणे सभागृहात या मुलांची पर्याय व्यवस्था केलेली आहे. पण सध्या पावसाच्या दिवस आहे, त्यात हा सभागृह पूर्णपणे गळतो, शिवाय या सभागृहाला खिडक्यांना झडपा देखील नाही. दिवसभरात येणारा पाऊस मुलांच्या अंगावर येतो.त्यामुळे मुलांच्या खाली सगळे पाणी साचते. सभागृहाची परिस्थिती देखील चांगली नाही. स्लॅबचे बाहेरील सिमेंट देखील निखळून पडले आहे. काही अनुसूचित प्रकार घडू नये, त्याकरिता कमीतकमी या वर्गाची पर्याय व्यवस्था दुसरी कडे करण्यात यावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या शाळेला तीन खोल्या मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अजूनतरी याबाबत शाळेला कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार झालेला नसल्याचे शिक्षकां कडून सांगण्यात येत आहे. खोल्या मंजूर झाल्या असतील तर लवकरच कामाला सुरुवात करावी अशी मागणी पालक वर्गातून जोर धरू लागली आहे.