घरपट्टीत भरमसाठ वाढ; नागरिकांमध्ये असंतोष

कोपरगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना भाजपच्यावतीने निवेदन
घरपट्टीत भरमसाठ वाढ; नागरिकांमध्ये असंतोष

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव नगर परिषदेमार्फत सध्या शहरातील मालमत्ता धारकांना घरपट्टी भरण्याच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. घरपट्टी करामध्ये नगरपरिषदेने भरमसाठ वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. नगरपरिषदेने घरपट्टी करामध्ये बेकायदेशीररित्या अवास्तव वाढ केली असून या वाढीव घरपट्टीबाबत नगरपरिषदेने फेरविचार करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.

यासंदर्भात उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांना निवेदन देण्यात आले. भाजपचे शहर उपाध्यक्ष किरण सुपेकर, सरचिटणीस सुशांत खैरे, चिटणीस सचिन सावंत, ओबीसी मोर्चाचे शहर उपाध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, गोपीनाथ गायकवाड, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष खालिकभाई कुरेशी, अल्ताफभाई कुरेशी, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष शंकर बिर्‍हाडे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण, गोपी सोनवणे, फकीर मोहम्मद पैलवान, राहुल रिळ आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव शहरात घरपट्टीमध्ये भरमसाठ वाढ केल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. राज्यात मार्च 2020 पासून करोना महामारीचे संकट उद्भवले होते. करोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे नागरिक आर्थिक संकटात सापडले होते. नागरिक अजूनही या संकटातून बाहेर निघू शकले नाहीत. त्यातच नगरपरिषद प्रशासनाने घरपट्टी करात बेकायदेशीररित्या अवाजवी वाढ केली असून या वाढीव घरपट्टी कर आकारणीमुळे नागरिकांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.

नगरपरिषदेने शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे कंत्राट नागपूर येथील आर. एस. कन्स्ट्रक्शनला दिले होते. या कंपनीने अतिशय बेजबाबदारपणे चुकीच्या पद्धतीने कोपरगाव शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले आहे. त्याचा फटका शहरातील सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. करोनाच्या संकटात आधीच जनता होरपळून निघाली आहे. आता नगरपरिषदेने अवास्तव घरपट्टी आकारणी करून मालमत्ताधारकांना नोटिसा दिल्या आहेत.

संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्यावर भरमसाठ घरपट्टीचा बोजा लादण्याचे नगर परिषद प्रशासनाचे हे धोरण अन्यायकारक आहे. तेव्हा घरपट्टीला स्थगिती द्यावी, शहरातील मालमत्तांचे पुन्हा सर्वेक्षण करून पूर्वीप्रमाणेच त्याची आकारणी करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com