
आश्वी |वार्ताहर| Ashwi
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे जुन्या भांडणाच्या रागातून समीर बाळकृष्ण होडगर यांची दुचाकी भर चौकात आणून पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली असून आश्वी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 8 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास समीर होडगर हा आश्वी बुद्रुक येथे गॅरेजसमोर उभा असताना रविंद्र उर्फ बंटी साहेबराव मदने हा त्या ठिकाणी आला व त्याने शिवीगाळ करत एक मोठा दगड उचलून समीर यांच्या पाठीत दोन ते तीन वेळा मारला. त्यामुळे समीरने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता समीरला धरुन माझ्या नादी लागला कारे, आता तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने समीरच्या डोक्यात दगड मारत दुखापत केली.
यावेळी जखमी झालेला समीर हा मदने याच्या तावडीतून सुटून पळाला. यावेळी मदने याच्या मित्राने समीरची दुचाकी आश्वी बुद्रुक बस स्थानकावर ढकलत आणली. यानंतर दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचे दाखल तक्रारीत म्हटल्याने आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 169/2022 नुसार भादंवी कलम 307, 324, 504, 427, 34 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्तवार्ता विभागाचे विनोद गंभिरे, हवालदार निलेश वर्पे, रवींद्र वाकचौरे, दहिनिवाल, वाघ आदि पोलीस कर्मचार्यांनी आरोपी रविंद्र उर्फ बंटी साहेबराव मदने व त्याचा मित्र (दोघे रा. आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर) या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. तर यातील एक जण अल्पवयीन असल्याने त्याच्यावर प्राथमिक कारवाईची प्रक्रियाकर त्याला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी घटना घडलेल्या ठिकाणाचा पंचनामा केला आहे. रविंद्र उर्फ बंटी मदने याच्यावर याआधी आश्वी व घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये हे स्वतः करत आहे.