
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मागील वादाच्या कारणातून बाप-लेकाला सात जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री पावणे अकरा वाजता डायमंड गल्ली, हाउसिंग हॉस्पिटल शेजारी घडली. शकील इब्राहिम खान (वय 53) व त्यांचा मुलगा आवेश खान (दोघे रा. जुना मंगळवार बाजार) हे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी शकील इब्राहिम खान यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आवेज तमिजोदीन काझी, बबलु कैसर काझी, रियान सिजाओ काझी, फैजान सिजाओ काझी, कामीन सिजाओ काझी, अरमान गोप्या काझी, गोप्या शफी काझी (सर्व रा. जुना मंगळवार बाजार, काझी गल्ली) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री फिर्यादी जेवण करून माळीवाडा येथे पान खाण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या मुलाने फोन करून आवेज काझी हा तुम्हाला काहीतरी बोलायचे आहे म्हणून बोलवत आहे, तुम्ही लवकर या असा फोन केला. फिर्यादी आले असता त्यांना मागील वादाच्या कारणातून आवेज काझीसह सात जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या फिर्यादीच्या मुलाला देखील मारहाण करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.