
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बाहेर चुकीचे सांगून अफवा पसरविल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिघांना सात जणांनी लाकडी दांडके, कुर्हाडीने मारहाण करून जखमी केले. मंगळवारी (दिनांक 25 एप्रिल) रात्री नऊ वाजता देहरे (ता. नगर) शिवारातील खळवाडी येथे ही घटना घडली.
याप्रकरणी गुलाब अब्दुल शेख (वय 65 रा. खळवाडी, देहरे) यांनी काल (बुधवारी) सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चाँद शेखलाल आत्तार, नासीर राजू शेख, रमजान चाँद अत्तार, अस्लम राजू शेख, जमशीद शेख (पूर्ण नाव माहिती नाही), नसिम राजू शेख, दिल शाद चाँद आत्तार (सर्व रा. खळवाडी, देहरे) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री गुलाब अब्दुल शेख त्यांच्या घरी असताना त्यांचा मुलगा सादिक हा शेजारी राहणारे चाँद आत्तार यांच्याकडे गेला व त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्याबद्दल बाहेर लोकांना चुकीचे का सांगता व अफवा का पसरविता की, मी माझ्या आई-वडिलांना सांभाळत नाही, अशी विचारणा केली.
त्याचा राग आल्याने चाँद शेखलाल आत्तार याने सादिकला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. फिर्यादी गुलाब शेख यांना आरडाओरडा ऐकू आल्याने ते मुलगा सादिकजवळ गेले असता नासीर शेखने लाकडी दांडक्याने सादिकला मारहाण केली. तसेच रमजान आत्तार, अस्लम शेख, जमशीद शेख, नसिम शेख, दिल आत्तार हे पळत तेथे आले व त्यांनी कुर्हाड, दांडक्याने गुलाब शेख व त्यांचा मुलगा सादिक यांना मारहाण केली. आवाज ऐकून मध्ये आलेल्या गुलाब शेख यांच्या मुलीला देखील मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अंमलदार डी. बी. पवार तपास करीत आहेत.