
अहमदनगर (प्रतिनिधी)-
येथील पेमराज सारडा महाविद्यालयात सुरू असलेल्या भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेत दोन कार्यकर्त्यांंमध्ये चांगलीच जुंपली. यावेळी एकमेंकांची उणी-दुणी काढत असतांना एकाने
दुसर्याच्या श्री मुखात लगावली. यामुळे एकच गोंधळ उडला. पक्षाच्या प्रदेश कार्यकारणी पदाधिकार्यांसमोर हा लाजीरवाना प्रकार घडला. अखेर पक्षातील ज्येष्ठांनी वादावादी घालणार्या दोघांची समजूत काढली आणि शिबिर पुढे सुरळीत सुरू झाले.
भाजपचे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सध्या जिल्हाभर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. नगर शहरातील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण काल रविवारी आयोजित करण्यात आले होते. यामध्ये नगर शहरातील चारही मंडलातील कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. करोनाच्या भितीने केवळ 170 कार्यकर्त्यांनी शिबिराला हजेरी लावली.
यावेळी ज्येष्ठ नेते प्रा. मधुसूदन मुळे यांचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांना बोलण्यासाठी संधी दिली जाणार आहे की नाही? असा सवाल मुकुंद देवगावकर यांनी केला. सायंकाळी सात वाजता बोलण्यासाठी संधी दिली जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यावरमध्ये देवगावकर यांनी आम्ही करोनाच्या काळात खूप काम केले, पक्षाने काय काम केले, ते आधी सांगावे. पक्षामध्ये गुंड प्रवृत्तीचे, गुन्हेगार लोक शिरले आहेत. ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, अशांना पदे दिली आहेत. पक्षातील चांगले विचार आणि चांगले लोक यामुळे बाजूला गेले आहेत.पक्षशिस्त बिघडली आहे आणि तुम्ही मात्र पक्षशिस्त काय असते. हे शिकवता, असा सवाल देवगावकर यांनी करताच त्यांच्यावर अनेक पदाधिकारी तुटून पडले. त्यामध्ये कुलकर्णी यांनी देवगावकर यांना तुम्ही पक्षाचे सदस्य नाहीत. एकदा निवडणूक लढविल्यावर परत पक्षाकडे फिरकलेच नाही, अशी विचारणा देवगावकर यांच्याकडे केली.
यामुळे कुलकर्णी-देवगावकर यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. या दोघांमध्ये महानगरपालिका निवडणुकीचे वार्डातील वाद आहेत. या वादाचे पडसाद या शिबिराच्या ठिकाणी उमटले. यावेळी देवगावकर यांच्या श्री मुखात लगावण्यात आली. यामुळे ते शिबिरातून बाहेर आले. यावेळी सचिन पारखी यांनी त्यांची समजूत काढली. तर शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी कुलकर्णी यांची समजूत काढली. पक्षाच्या ज्येष्ठांनी मध्यस्ती केल्यानंतर वाद मिटला आणि प्रशिक्षण सुरू झाले. मात्र, शिबिरात घडलेल्या या प्रकाराची दिवसभर नगर शहरात खमंगदार चर्चा सुरू होती.