मनपामध्ये खड्ड्यांचे प्रदर्शन; आयुक्तांना 'गांधारीरत्न' पुरस्कार

मनपामध्ये खड्ड्यांचे प्रदर्शन; आयुक्तांना 'गांधारीरत्न' पुरस्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)

नगर शहरातील खड्यांचा विषय सध्या चर्चेत आहे. पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठी खड्डी पडली असून त्याला डबक्याचे स्वरूप आले आहे.

शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्यांच्या फोटोचे प्रदर्शन महापालिकेत भरविले होते तसेच आयुक्त शंकर गोरे यांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून त्यांना 'गांधारीरत्न' पुरस्कार देऊन नगरकरांची तळतळ दाखवून देण्याचा प्रयत्न मनसेकडून करण्यात आला.

शहरातील खड्ड्यांच्या समस्येमुळे नगरकर हैराण झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने महापालिकेत खड्ड्यांचे प्रदर्शन भरवत अनोखे आंदोलन आंदोलन केले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपासून नगरकर खड्ड्यांच्या समस्येपासून त्रस्त आहेत. पालिकेला या गोष्टीचे गांभीर्य नाही. आताही आयुक्तांसोबत चर्चा केली, पण तेच गोंधळात दिसत आहेत.

आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करून आयुक्तांना निवेदन दिले असून त्यांना 'गांधारी रत्न' हा पुरस्कार दिला आहे. या समस्येला आयुक्त, महापालिका प्रशासन, महापौर, शहराचे आमदार या सर्वांचा डोळेझाकपणा जबाबदार आहे. समस्या सोडवण्यासाठी त्यांना आम्ही आठ ते पंधरा दिवसांची मुदत दिली. या मुदतीत खड्डे बुजवण्याचे काम झाले नाही, तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने करण्यात येणार आहे.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका आयुक्त गोरे यांना प्रदर्शन पाहण्यास येण्याची विनंती केली. परंतु त्यांनी माझ्या ऐवजी उपायुक्त प्रदर्शन पाहण्यास येतील, तसा प्रोटोकॉल असतो, असे सांगितले. त्यानंतर उपायुक्त यशवंत डांगे प्रदर्शन पाहण्यासाठी आले. कार्यकर्त्यांनी त्यांना प्रदर्शनात लावण्यात आलेले विविध रस्त्यांचे फोटो दाखवत त्याची माहिती दिली.

Related Stories

No stories found.