बांधकाम व्यवसायात पुन्हा तेजीचे दिवस

क्रेडाई राज्य बैठकीत स्थित्यंतरावर चर्चा
बांधकाम व्यवसायात पुन्हा तेजीचे दिवस

अहमदनगर | प्रतिनिधी

उत्कृष्ट दर्जा व विश्वासार्हता ही क्रेडाईची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. कोविड काळात बांधकाम व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला. असे असले तरी आता मळभ दूर होत असून बांधकाम व्यवसायात तेजी निर्माण होत आहे, असा आशावाद क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनिल फुर्दे यांनी व्यक्त केला.

बांधकाम क्षेत्रातील क्रेडाई संघटनेच्या महाराष्ट्र राज्य शाखेची २६ वी वार्षिक जनरल बॉडी मिटिंग शनिवारी नगरमध्ये झाली. सभेचे उद्घाटन मनपा आयुक्त शंकर गोरे व क्रेडाई राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांच्याहस्ते झाले. यावेळी क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनिल फुर्दे, प्रेसिडेंट इलेक्ट प्रमोद खैरनार, सचिव सुनिल कोतवाल, क्रेडाई अहमदनगरचे अध्यक्ष अमित मुथा, सेक्रेटरी अमित वाघमारे, महाराष्ट्रचे जॉइंट सेक्रेटरी संजय गुगळे, आशिष पोखरणा, प्रसाद आंधळे, जवाहर मुथा, ऍड. जयवंत भापकर उपस्थित होते.

फुर्दे म्हणाले की, आताच्या काळात शासनही परवडणार्या घरांच्या निर्मितीसाठी आग्रही आहे. प्रत्येकाला स्वतःचे हक्काचे घर असावे यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. शासनाच्या या प्रयत्नांना क्रेडाईचे सदस्यही वेळोवेळी सहकार्य देतात. मात्र सध्या स्टिल, सिमेंटचे दर खूप वाढले आहेत. बांधकाम करताना अनेक प्रकारचे कर भरावे लागतात. या गोष्टींकडे सरकारने लक्ष दिल्यास बांधकाम व्यावसायिकांनाही सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे निश्चितच निर्माण करता येतील. महारेरा कायदा निर्माण होण्यासाठी क्रेडाईनेच पुढाकार घेतला होता. त्यापूर्वीही क्रेडाई आपल्या सर्व सदस्यांना नियमावलीतच काम करण्यास प्रवृत्त करीत होती. रेरामुळे बांधकाम व्यावसायिक व ग्राहक दोघांनाही फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रेडाई महाराष्ट्रच्या राज्यात ६० नोंदणीकृत शाखा असून ३ हजारांहून अधिक बांधकाम व्यावसायिक संघटनेचे सभासद आहेत. याशिवाय ५५ शहरात युथ विंग व २९ शहरात वूमेन्स विंगही चालू आहे. ही संघटना आयएसओ ९००१-२०१५ प्रमाणित आहे. व्यवसाय करतानाच संघटना सामाजिक बांधिलकीही जपण्याचे काम करते. यातूनच रक्तदान शिबिरे, वृक्ष लागवड, आपत्तीग्रस्तांना मदत असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.

कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत क्रेडाई अहमदनगचे अध्यक्ष अमित मुथा यांनी केले तर प्रास्ताविक संजय गुगळे यांनी केले. या बैठकीत सतीश मगर यांनी कोविड काळानंतर रियल इस्टेट बिझनेस या विषयावर सविस्तर विवेचन केले. शांतीलाल कटारिया यांनी डेव्हलपर्सचे यश आणि अपयश या विषयावर तर अरविंद लिंबानी, सिध्दार्थ वासुदेवन यांनी तांत्रिक विषयांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. या बैठकीला राज्यभरातील १५० हून अधिक ब्रढाईचे सदस्य उपस्थित होते. यशस्वीतेसाठी गिरीश आगरवाल, सागर गांधी, नितीन गुगळे, प्रसाद आंधळे, दिपक बांगर, राहुल अडसुरे, प्रकाश मेहता, सचिन कटारिया, कमलेश झंवर, राजेंद्र पाचे, संजय पवार, विक्रम जोशी, संजोग गुगळे, सचिन कटारिया, गौरव पितळे, शिवांग मेहता, मयूर राहिंज, नितेश गुगळे, तुषार लोढा, आदींनी परिश्रम घेतले.

ऐतिहासिक महत्व असलेला नगर जिल्हा साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. क्रेडाई अहमदनगरने आपल्या कामातून नगरच्या विकासाला, अर्थकारणाला चालना देण्याचा प्रयत्न करावा. क्रेडाईच्या वार्षिक बैठकीतून सर्वांनाच बांधकाम व्यवसाय करताना नवी दिशा मिळेल असा विश्वास आहे.

सतीश मगर, राष्ट्रीय अध्यक्ष, क्रेडाई

सुनियोजित व सुंदर बांधकामे असतील तर शहराची वेगळी ओळख निर्माण होते. त्यादृष्टीने क्रेडाईच्या सर्व सदस्यांनी कल्पक बांधकामे केली पाहिजे. बांधकाम व्यावसायिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मनपाची कायम सहकार्याची भूमिका राहिल.

शंकर गोरे, मनपा आयुक्त

Related Stories

No stories found.