गोदावरीत ४७६९ क्युसेकने विसर्ग

 File Photo
File Photo

अस्तगाव (वार्ताहर)

दारणाचा विसर्ग वाढल्याने नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीतील विसर्ग काल दुपारी १२ वाजता ४७६९ क्युसेक इतका करण्यात आला. तो रात्री उशीरापर्यंत टिकून होता. खाली जायकवाडी जलाशयाचा साठा काल सायंकाळी ६ वाजता ५३.५९ टक्क्यांवर पोहचला होता. नविन पाण्याची आवक या जलाशयात १७००० क्युसेकने सुरू होती.

दारणा ९६.४९ टक्क्यांवर स्थिर आहे. तर गंगापूरचा साठा काहिसा वाढला आहे. गंगापूर मध्ये ९२.७५ टक्के पाणीसाठा आहे. काल सकाळी संपलेल्या मागील २४ तासांत या धरणांच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दारणाच्या भिंतीजवळ ३४ मिमी, पाणलोटातील इगतपुरीला २७ मिमी, घोटीला २९ मिमी पावसाची नोंद झाली. वाकीला ५३ मिमी पावसाची नोंद झाली. भावलीला ३७ मिमी असा पाऊस नोंदला गेला. तर गंगापूरच्या भिंतीजवळ १३ मिमी, पाणलोटातील अंबोली येथे २८ मिमी, कश्यपी ९ मिमी, गौतमी गंगापूर १८ मिमी असा पाऊस नोंदला गेला.

दारणा धरणात भाम मधून २००० क्युसेक, भावलीतुन २८२ क्युसेकने पाणी दाखल होत आहे. २४ तासांत दारणात १७० दलघफू नविन पाणी दाखल झाले. त्यामुळे काल सकाळी या धरणातून नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याच्या दिशेने २६४२ क्युसेक ने विसर्ग सुरु होता. काल सायंकाळी तो वाढवून ३४२५ इतका करण्यात आला. वालदेवीतून ६५ क्युसेक, कडवातुन २५० क्युसेक पाणी दारणा धरणाच्या खाली विसर्गात समाविष्ट होत आहे. त्यामुळे ही आवक होत असल्याने नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून काल सकाळी सुरू असलेला २४२२ क्युसेक इतका विसर्ग काल दुपारी १२ वाजता ४७६९ क्युसेक इतका करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com