एकाच फोन कॉलवर ग्रामस्थांना मिळणार आपत्तीची माहिती

एकाच फोन कॉलवर ग्रामस्थांना मिळणार आपत्तीची माहिती

इंदोरी |वार्ताहर| Indori

कोणतेही संकट अथवा आपत्ती आल्यास ग्रामसुरक्षा यंत्रणेतील फोन कॉल द्वारे गावातील सर्व मोबाईल धारकांना काही क्षणातच संकट अथवा आपत्तीची माहिती मिळणार असून त्या संकटाशी अथवा आपत्तीशी काही मिनिटातच सामूहिक मुकाबला ग्रामस्थांना करता येईल. रुंभोडी ता. अकोले ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसुरक्षा यंत्रणेची सेवा ग्रामस्थांना देणार असल्याचे सरपंच रवी मालुंजकर यांनी सांगितले.

ग्रामसुरक्षा यंत्रणेचे जनक डी. के. गोर्डे यांच्या मार्गदर्शनातून व रुंभोडी चे सरपंच रवी मालुंजकर यांच्या संकल्पनेतून ग्राम सुरक्षा यंत्रणा वापर आणि गरज याविषयी रुंभोडी गावात प्रबोधन सभा पार पडली. ग्रामसुरक्षा यंत्रणेचे वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे, अकोले पोलीस स्टेशनचे स.पो.नि. बाळासाहेब पारधी यावेळेस उपस्थित होते .

चोरी, दरोडे, विषारी सर्पदंश, लहान मूल हरवणे, बिबट्याचा हल्ला, आग, वाहन चोरी, अपघात, महिलांची छेडछाड, शाळेकडील सूचना, पोलिसांकडील सूचना आदी गोष्टी प्रत्येकापर्यंत पोहोचवणे अवघड असतात मात्र जेव्हा घटना घडते तेव्हा मात्र ही यंत्रणा हातात असल्यास आपल्या जवळील मोबाईल मधून ग्रामसुरक्षा यंत्रणेला माहिती दिल्यास क्षणातच गावातील सर्व मोबाईलवर हा कॉल जातो. त्यामुळे सर्वांना संकटाची सूचना मिळते परिणामी मदतीसाठी पोहोचता येते.

या यंत्रणेच्या वापरामुळे गुन्हेगारांना चांगलीच जरब बसली असून गुन्हयांचे प्रमाणही आटोक्यात राहणार असल्याची माहिती यंत्रणेचे वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे यांनी सांगितले. स.पो.नि. पारधी यांनी ही मनोगत व्यक्त केले. सरपंच रवी मालुंजकर यांनी ग्रामस्थांना ग्रामपंचायत च्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. प्रगतशील शेतकरी साहेबराव मालुंजकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जालिंदर मालुंजकर, पोलीस पाटील गोरक्ष शिंदे, बाळासाहेब मालुंजकर, सदस्य रमेश सावंत, नितीन मालुंजकर, रवी पंचम, महेश माळवे व ग्रामस्थ यावेळेस मोठ्या संख्येने हजर होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com