दूध दरवाढीसाठीचे आंदोलन सुरुच ठेवणार

किसानसभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय
दूध दरवाढीसाठीचे आंदोलन सुरुच ठेवणार

अकोले | प्रतिनिधी | Akole

दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी किमान 30 रुपये प्रति लिटर भाव द्या या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी बोलावलेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने आपले आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा केली आहे.

दुधाला 30 रुपये दर मिळावा यासाठी सरकारने प्रति लिटर 10 रुपये अनुदान सरळ शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करावे व राज्यातील गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दूध पावडरला 50 रुपये निर्यात अनुदान द्यावे अशी मागणी बैठकीत किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. बहुतांश शेतकरी नेत्यांनी व दुध संघांच्या प्रतिनिधींनीही याच प्रकारची मांडणी केली.

मात्र ही बैठक प्राथमिक असल्याने आपण केवळ शेतकरी संघटना व दुध संघांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकूण घेऊ व या आधारे मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय करू अशी भूमिका दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी मांडली. प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या मागण्या काय आहेत हे सरकारला अगोदरच माहीत होते. सरकारने या माहितीच्या आधारे अगोदरच मंत्रिमंडळात चर्चा करून या प्रश्नांवर उपाय असणारा प्रस्ताव तयार करायला हवा होता.

कालच्या बैठकीत असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या वतीने मांडला न गेल्याने शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली आहे. सरकार लवकरच या प्रश्नी शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी योजना आणेल असे बैठकीत सांगण्यात आले असले तरी अशी योजना नक्की कधी येणार याबाबत कोणतीही कालबद्ध सीमा सांगण्यात आलेली नाही. अशा पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने आपले आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा केली आहे.

किसान सभेचे नेते, राज्य कौन्सिलचे सदस्य व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेत्यांबरोबर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा तातडीने ठरविण्यात येत आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रत्यक्ष न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे असा इशारा माहिती डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख व डॉ.अजित नवले यांनी दिला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com