संचालक मंडळाला क्लिनचिट देणारा अहवाल फेटाळला

टिळकनगर कामगार पतपेढी गैरव्यवहार प्रकरण
गैरव्यवहार
गैरव्यवहार

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर परिसर उद्योग समूह पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित टिळकनगर झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशासाठी नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी यांचा अहवाल सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीरामपूर यांनी फेटाळला आहे. त्यामुळे संचालक मंडळ व कर्मचारी यांच्यावर कारवाईची टांगती कुर्‍हाड कायम आहे.

या संस्थेमध्ये 2015- 2020 या कालावधीसाठी निवडून आलेले संचालक मंडळ व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात लाखो रुपये इतर अ‍ॅडव्हान्स म्हणून उचलले होते. या संस्थेतील संचालक शांतवन सोनवणे यांनी संचालक मंडळाच्या मासिक मिटिंग मध्ये वारंवार इतर अ‍ॅडव्हान्स भरणेकामी आवाज उठवला होता.

या अनुषंगाने दि. 12 मार्च 2020 रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीरामपूर यांनी संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 अन्वये चौकशी आदेश पारित केला होता, त्या अनुषंगाने दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजी प्राधिकृत अधिकारी अ‍ॅड. अरविंद मुळे अहमदनगर यांनी वरील प्रस्तुतप्रकरणी अहवाल सादर केलेला आहे.

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीरामपूर यांनी सदर अहवालात अवलोकन केले असता, टिळकनगर परिसर उद्योगसमूह पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित टिळकनगर या संस्थेचे संचालक मंडळ व अधिकारी व कर्मचारी यांनी 2017-18, 2018-19, 2019- 20 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अ‍ॅडव्हान्स रक्कम वसूल केली असून, त्या रकमा पुन्हा भरणा केलेला नाहीत. त्यामुळे संस्थेच्या आर्थिक नुकसान झालेले आहे त्या अनुषंगाने प्रधिकृत चौकशी अधिकारी यांनी दिलेल्या अहवालात खालील बाबी आढळून आलेले आहे.

किती संचालक व अधिकारी व कर्मचार्‍यांनी सन 2017-18 2018-19, 2019-20 या कालावधीत अ‍ॅडव्हान्स रक्कम उचल केले आहे. त्याचे नावानिशी उल्लेख केलेला दिसत नाही. संस्थेचे मॅनेजर भालेराव व चेअरमन बाळासाहेब गणपतराव दिघे हे दोनच व्यक्तीची सुनावणी होऊन चौकशी अहवाल तयार केलेले आहे.

सदर चौकशी अहवाल मध्ये तक्रारदार शांतवन लक्ष्मण सोनवणे यांचे मुद्याचा समावेश केलेला दिसत नाही. संस्थेचे चेअरमन यांच्याकडील दि. 22 जुलै 2020 रोजीचे लेखी पत्रानुसार दि. 31 डिसेंबर 2018 रोजी 77 लाख 56 हजार 900 रुपये रक्कम होती, त्यापैकी 5 लाख 28 हजार इतका भरणा दि. 29 मार्च 2019 रोजी केलेला आहे, उर्वरित रक्कम 2 लाख 28 हजार 900 रुपये शिल्लक राहिलेल्या माहे एप्रिल व मे 2019 मध्ये 2, 50000 भरणा केलेला आहे. त्यांच्याकडे आता कोणतही अ‍ॅडव्हान्स रक्कम शिल्लक नसल्याचे नमूद केले आहे, तथापि चेअरमन व प्राधिकृत चौकशी अधिकार्‍यांनी दर्शवलेल्या रकमेत तफावत दिसून येते.

चौकशी अहवाल सोबत सन 2017-18 व सन 2018- 19 या कालावधीची ऑडिट मेमो प्रती जोडलेल्या आहे. त्यानुषंगाने वरील मुद्यांची अवलोकन करून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीरामपूर यांनी दि. 15 ऑगस्ट 2020 रोजीच्या संचालक मंडळाला क्लिनचीट देणारा सादर केलेला अहवाल मोघम स्वरूपाची असल्याने अमान्य करण्यात आला तसे पत्र अ‍ॅड. अरविंद मुळे यांना दि. 19 ऑगस्ट 2020 रोजी दिले आहे त्यांची माहिती प्रत नुकतीच शांत सोनवणे यांना प्राप्त झाली आहे वरील प्रकरणी संचालक मंडळ व कर्मचारी यांच्यावर कारवाईची टांगती कुर्‍हाड कायम असून, वरील प्रकरणाकडे दत्तनगर, टिळकनगर परिसराचे याकडे लक्ष लागून आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com