नगर अर्बन बँकेच्या संचालकांना अटक करा

बँक बचाव कृती समितीची मागणी, पोलिसांकडे करणार पाठपुरावा
नगर अर्बन बँकेच्या संचालकांना अटक करा
नगर अर्बन बँक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेची 150 कोटीची फसवणूक करणारा व सध्या अटकेत असलेला आरोपी सचिन गायकवाड हा पोलिस तपासात जे बोलत आहे, ते पाहता या बँकेच्या संचालकांना तातडीने अटक करण्याची मागणी नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केली आहे.

संचालक मंडळाने कोणतेही नियम न पाळता, बनावट कागदपत्रे घेवून इतर बँकांमध्ये थकबाकीदार असलेल्या कर्जदारांना 10 कोटी, 15 कोटी, 25 कोटी अशी मोठी कर्जे दिली व ज्यावेळी ही कर्जे थकबाकीत गेली, त्यावेळी आणखी नवीन कर्जे मंजूर करून या थकबाकीत भरली व बँकेच्या तोट्याचा खड्डा मोठा करीत करीत आज बँक बंद करण्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवली आहे, असा दावा करून गांधी म्हणाले, खरेतर एवढ्या एकाच गोष्टीवर बँकेचे संचालकदेखील तातडीने ताब्यात घेतले पाहिजेत.

दीडशे कोटीच्या फसवणुकीबद्दलच्या फिर्यादीमधील कलमे ही नॉन बेलेबल म्हणजेच अजामीनपात्र आहेत व कोणत्याही संचालकाकडे अटकपूर्व जामीन देखील नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तातडीने व जलद तपास होवून बँकेचे म्हणजे ठेवीदारांचे पैसे वसूल होण्यासाठी आता संचालकांची तातडीची अटक जरूरीची झाली आहे, असे म्हणणे गांधी यांनी मांडले आहे.

टक्केवारीसाठीच वाटप

बँकेच्या सध्याच्या संचालकांमध्ये अनेक व्यापारी आहेत. कोणाचे सोन्यांच्या दागिन्यांचे दुकान आहे, तर कोणाचे कपड्याचे तर कोणाचे प्लायवूडचे, कोणाचे मेडीकलचे तर कोणी दारूचे उत्पादन करतात. समजा एखादी अनोळखी व्यक्ती यांच्या दुकानात आली आणि यांना म्हणाली की 10 हजाराचे उधार द्या, तर ही मंडळी असे उधार देणार का? नाही देणार. तर मग हेच संचालक बँकेचा कारभार करताना 10,15,20,25 कोटी रुपये सहजगत्या व कोणालाही देत होते, असे का, असा सवाल करून गांधी म्हणाले, याचे उत्तर एकतर हे पैसे बँकेचे व ठेवीदारांचे होते आणि संचालकांच्या मालकीचे नव्हते व यातून साधणारी टक्केवारी फक्त संचालकांच्या फायद्याची होती, असे गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com