पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

राहाता तालुक्यात ग्रामीण भागात सर्वात मोठ्या समजल्या जाणार्या पुणतांबा गावातील ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन

विविध कार्यालयातील कामे करण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे 26 जून 1999 मध्ये राहाता तालुक्याची निर्मिती होऊन त्यात पुणतांबा गावाचा समावेश झालेला आहे. मात्र विधानसभेसाठी पुणतांब्याचा समावेश कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आहे. असे असले तरी ग्रामस्थांना महत्त्वाची कामे करण्यासाठी राहात्याला जावे लागते. मात्र पुणतांबा-राहाता अशी थेट बससेवा नाही.

राहात्याला जाण्यासाठी खैरी निमगाव किंवा शिर्डीहून जावे लागते. त्यामध्ये वेळ व पैशाचा उपव्यय होतो. पुणतांबा-जळगाव एकरुखेमार्गे राहाता बससेवेची ग्रामस्थांनी व विद्यार्थी वर्गाने वारंवार मागणी केली. मात्र कोणीही दखल घेत नाही. पुणतांबेकरांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झालेली आहे.

थेट बससेवा नसल्यामुळे राहाता येथील विविध विभागांची कामे करण्यासाठी अनेकांना मध्यस्थांची मदत घ्यावी लागते व असे एजंट कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची अडवणूक करतात. म्हणून लोकप्रतिनिधींनी पुणतांबा-राहाता अशी थेट बससेवा तातडीने सकाळी व सायकांळी सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

या मागणीसाठी वेळप्रसंगी ग्रामस्थांच्यावतीने धडक आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलाचे तालुका उपाध्यक्ष संदीप वहाडणे यांनी दिला आहे.