दिवाळीच्या कमी केलेल्या सुट्ट्यांची भरपाई मिळणार

दिवाळीच्या कमी केलेल्या सुट्ट्यांची भरपाई मिळणार

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

महाराष्ट्रात शालेय शिक्षण विभागाच्यावतीने 11 नोव्हेंबरला शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक जिल्हा परिषदेच्यावतीने सुट्ट्यांचे केलेले नियोजन पूर्णतः रद्द झाले आहे. त्यामुळे शाळांची सुट्टी कमी झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन जितके दिवस कमी झाले असतील तितके दिवस चालू शैक्षणिक वर्षाच्या अंतर्गत सुट्ट्या घेता येतील, असे आदेश राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिले आहेत.

राज्यभर स्थानिक प्रशासनाच्या वतीने 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर अशी दिवाळीची सुट्टी जाहीर केली गेली होती. परंतु राष्ट्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण परीक्षा 12 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्व नियोजित असलेल्या सुट्ट्या कमी करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने सुट्टीचा कालावधी 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर असा करण्यात आला आहे. परंतु यापूर्वीच केलेल्या नियोजनानुसार 28, 29 आणि 30 ऑक्टोबर या तिन्ही दिवशी परीक्षांचे आयोजन असल्यामुळे बहुतांश शाळा सुरूच होत्या.

आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना दिवाळीच्या सुट्ट्या कमी झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना यासंदर्भात आदेश दिले होते. शिक्षण आयुक्त यांच्याशी चर्चा करून कमी झालेल्या सुट्ट्याची भरपाई देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार शिक्षण संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी दिवाळीच्या कमी झालेल्या सुट्ट्यांची भरपाई देण्यात येईल अशा आशयाचे परीपत्रक काढले आहे. शाळांना कमी झालेल्या दिवाळी सुट्ट्या, नाताळ किंवा उन्हाळी सुट्टीमध्ये समायोजन करता येणार आहे. या संदर्भातले अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com