दिपावलीनिमित्त कोल्हार भगवतीपूरची बाजारपेठ सज्ज

आठवडाभरापासून करोनाचा प्रभाव ओसरला
दिपावलीनिमित्त कोल्हार भगवतीपूरची बाजारपेठ सज्ज

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

संपूर्ण नगर जिल्ह्यात नावाजलेली कोल्हार भगवतीपूरची व्यापारी बाजारपेठ दिपावलीनिमित्त ग्राहकांसाठी सज्ज झाली आहे.

याकाळात जिल्ह्यातील त्याचप्रमाणे आसपासच्या परिसरातून येणारा ग्राहकांचा येथील वाढता ओघ लक्षात घेऊन व्यावसायिकांनी पूर्णतः तयारी केली आहे. ग्राहकांच्या आवडी निवडीच्या अनुषंगाने सर्व व्यावसायिक दुकानदारांनी निरनिराळ्या व्हरायटीचा नवीन माल आपापल्या दालनांमध्ये भरला आहे. सुदैवाने गेल्या आठवडाभरापासून येथील करोनाचा प्रभाव ओसरला आहे.

दिवाळीच्या काळात प्रामुख्याने कापड खरेदी, किराणा, सौंदर्यप्रसाधने, गोडधोड मेवा - मिठाई, फरसाण, फटाके, आकाश कंदील, सुवर्णालंकार, फर्निचर, रंगरंगोटी, स्टेशनरी, इलेक्ट्रिकल सामान, गृह सजावटीच्या वस्तू, सायकल तथा दुचाकी वाहने, मोबाईल तथा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, भांडी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल अधिक असतो.

त्यादृष्टीने येथील नावाजलेल्या बाजारपेठेत ग्राहकांना आवश्यक त्या वस्तू सहजरीत्या, अल्पदरात उपलब्ध होतात. यापार्श्वभूमीवर ग्राहकांचा कल कोल्हार भगवतीपूरच्या बाजारपेठेकडे असतो. हा आजपर्यंतचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. सणासुदीच्या काळात येथील बाजारपेठेत प्रतिदिन लाखो रुपयांची उलाढाल होते.

अनेक वर्षांपासून राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथील व्यापारी बाजारपेठेची सर्वत्र ख्याती आहे. ग्राहकांच्या पसंतीस खरी उतरलेली बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या या बाजारपेठेत दीपावलीच्या काळात ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. मध्यंतरीच्या काळात गावात काही प्रमाणात आढळलेल्या करोना रुग्णांची संख्या कमालीची कमी झाली आहे.

नागरिक व व्यापारी शासनाच्या सर्व आवश्यक निर्देशांचे पालन करू लागल्याने रुग्णसंख्या नियंत्रित करण्यात यश मिळाले आहे. ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे हे फलित असून आता दिवाळीच्या काळात वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करण्याकरिता येणार्‍या ग्राहकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. तरीही खबरदारी म्हणून दुकानदारांनी व ग्राहकांनी तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधणे, आपापसांत सुरक्षित अंतर राखणे, सॅनीटायझरचा वापर करणे अनिवार्य असल्याचे कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अ‍ॅड.सुरेंद्र खर्डे यांनी सांगितले.

कोल्हार भगवतीपूरकरांना सध्याची परिस्थिती दिलासादायक आहे. मागील महिन्यात कोल्हार व भगवतीपूरमध्ये काही प्रमाणात वाढलेल्या करोना बाधित रुग्णांच्या संख्येत 8 - 10 दिवसांपासून कमालीची घट झालेली आहे. या काळात कोणाचा प्रभाव ओसरला आहे. येथील नागरिक, व्यापारी, शेतकरी आदींनी योग्य ती खबरदारी घेतली. प्रशासन व आरोग्य यंत्रणेला सहकार्य केले. त्यामुळे सकारात्मक परिणाम घडून येत आहेत. रुग्णसंख्येबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. करोना महामारीचे संकट जगातूूून टळलेले नाही. पुन्हा रुग्णसंख्या वाढू नये म्हणून जनतेने योग्य ती काळजी व खबरदारी घेतल्यास करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणे शक्य असल्याचे कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय घोलप यांनी सांगितले.

दीपावली म्हणजे मांगल्याचा सण. उत्साह आणि नवचैतन्याचा उत्सव. लक्ष्मी आणि भरभराटीच्या स्वागताचा मुहूर्त. अशा या हर्षोल्हासाच्या सणाला कोल्हार भगवतीपूरची बाजारपेठ ग्राहकांच्या स्वागताला जोमाने सज्ज झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com