दिवाळीनिमित्त श्रीरामपूरची बाजारपेठ गर्दीने फुलली

विविध ठिकाणी वाहतुकीची कोंडी
दिवाळीनिमित्त श्रीरामपूरची बाजारपेठ गर्दीने फुलली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दिवाळीनिमित्त नागरिकांची बाजारात खरेदीसाठी काल मोठी गर्दी झाली होती. गर्दीमुळे प्रमुख ररस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. गेल्या तीन चार दिवसांपासून नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडले असून बाजारपेठ गर्दीने फुलून गेल्याचे चित्र दिसत आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. विविध प्रकारचे गोडधोड पदार्थ आणि आनंद द्विगुणित करणारा सण म्हणजे दीपावली. या काळात शहरात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. या पार्श्वभुमीवर शहरात ग्रामीण भागातून व बाहेरगावचे लोक खरेदीसाठी येत असून विविध सवलतींद्वारे व्यापारी तसेच विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत

अनेक व्यापार्‍यांनी रस्त्यावर स्टॉल्स लावल्यामुळे रस्त्यावर गर्दी वाढली आहे. शहरातील बस स्थानक रस्त्यावर तसेच बाजारपेठतील मेन रोड, शिवाजी रोड, संगमनेर रोड, नेवासा रोड, या ठिकाणी कपडे, आकाश कंदील, फटाके, पणत्या, रांगोळी, सुगंधी तेल, उटणे आदींचे स्टॉल मोठ्या प्रमाणात उभारले आहेत.

विविध प्रकारचे तयार कपडे, बालगोपाळांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस, विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य, किराणा दुकान, फराळाचे साहित्य, मिठाईची दुकाने, आकाशकंदील, पूजेचे साहित्य, रांगोळ्या आदी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले असून त्याच्या खरेदीसाठी मुख्य रस्त्यावर गर्दी वाढली असल्याने शहराला यात्रेचे स्वरूप निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे शहरातील मेनरोडवर रस्त्यातच झाडू, लक्ष्मी मूर्ती, पणत्या विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात स्टॉल मांडले आहेत. विविध आकारातील आकर्षक पणत्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून करोनाचे संकट सर्वच सणांवर कोसळले होते. करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे मोबाईल, टीव्ही, वॉटर प्युरिफायर, आटाचक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वाशिंग मशीन, फ्रिज आधी घरगुती वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहक फायनान्सला पसंती देताना दिसत आहेत. यामुळे घरगुती वस्तूंच्या दुकानांमध्येही खरेदी व विक्रीची मोठी झुंबड सुरू आहे. थत्ते मैदानावर मोठ्या प्रमाणात फटाक्यांचे स्टॉल्स असून तेथेही लहान मुलांसह मोठ्यांची गर्दी दिसत आहे. झेंडूच्या फुलांना मात्र यंदा कमी भाव मिळाल्याने शेतकरी व फूल विक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. आदल्या दिवशी 40 ते 60 रुपये किलोने विकली गेलेली फुले काल दुपारनंतर 20 रुपयांना विकण्याची वेळ आली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com