अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बनावट डिझेल प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

राहुरीचा ‘भाई’ या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. पोलीस त्याच्या शोधासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.नगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणात आतापर्यंत दोन जणांना अटक झाली आहे. त्यातील गोकुळ सूर्यवंशी याला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ झाली आहे.

नगर शहरात तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या पथकाने 26 ऑक्टोबर रोजी छापा टाकून 1 हजार 937 लिटर बनावट डिझेल जप्त केले होते. या कारवाईला आठ दिवस उलटले तरी मुख्य सूत्रधाराला अटक झाली नाही. छापा टाकला त्यादिवशी गौतम बेळगे याला अटक केली आहे. तर शहर उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडे तपास आल्यानंतर या गुन्ह्यात दुसरा आरोपी सूर्यवंशी याला अटक करण्यात आली आहे.

तपासी अधिकारी उपअधीक्षक ढुमे यांनी या तपासात लक्ष केंद्रीत केले आहे. शहरात हे डिझेल कुठून आले, यामध्ये कोणाचा हात आहे, आदी बाबींचा तपास केला जात आहे. पोलिसांना मुख्य आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. तो राहुरीतील ‘भाई’आहे.

एकेकाळी जिल्ह्यात नाप्ता भेसळीचा मास्टरमाईंड असलेला राहुरीचा ‘भाई’ हाच डिझेल प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्या शोधासाठी राहुरीसह जिल्ह्यात पोलिसांचे एक पथक काम करत आहे. पुणे जिल्ह्यातही त्याचा शोध घेतला जात आहे. तपासाबाबत पोलिसांनी गोपनीयता बाळगळी आहे. डिझेलचे नमुने रासानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. प्रयोगशाळेतील अहवालानंतर हे डिझेल नेमके कोणते आहे व त्याच्यात कशाची भेसळ केली जाते हे समोर येणार आहे.